नवी मुंबई : खारघर येथे बंदोबस्तासाठी असलेल्या आणखी सहा केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा जवानांचे कोरोनाच रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याची माहिती विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. याआधी पाच जवानांचे कोरोना व्हायरसचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणाऱ्या 12 कर्मचारी यांच्यापैकी 5 जवानांना कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19 टेस्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री (2 एप्रिल) 146 अधिकारी/कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश जारी केले होते. तात्काळ त्यांची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली. यापैकी 6 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. अन्य जिल्ह्यात अशाप्रकारे कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या