मुंबई: हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली (Panvel to Kalamboli)स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे घसरून तब्बल 24 तास उलटून गेलेले असूनही अजून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग सुरळीत झालेले नाहीत. यापैकी एक मार्ग जो मुंबईतून कोकणात जातो त्याचे काम पूर्ण झालेले असून त्यावरून दोन्ही बाजूच्या एक्सप्रेस गाड्या हळूहळू नेण्यात येत आहेत. या दरम्यान प्रवासी मात्र चांगलेच संतप्त झाल्याचं दिसून येतंय. दिवा स्थानकात प्रवाशांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ लोकलची वाहतूकही खोळंबली होती. 


आतापर्यंत विविध स्थानकात रखडलेल्या तुतारी एक्सप्रेस, मंगळूरु एक्सप्रेस, मडगाव एलटीटी एक्सप्रेस, आणि ओखा एरणाकुलम एक्सप्रेस या मार्गस्थ झालेले आहेत. मात्र अजूनही कोकणातून मुंबईत येणाऱ्या मार्गाचे काम मोठ्या प्रमाणात उर्वरित असल्याने कोकणातून मुंबईत येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या या कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर सध्या थांबून आहेत किंवा त्या रद्द करण्यात आलेले आहेत.


शनिवारी रात्री दहा वाजता सीएसएमटी वरून निघालेली मंगळूरू एक्सप्रेस आता पनवेल स्थानक पार करत आहे. तब्बल 18 तास या प्रवाशांना पनवेलपर्यंत पोहोचण्यासाठी लागले. हीच एक्सप्रेस रात्रभर थांबवून ठेवल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी दिवा स्थानकात रेल रोको केले. त्यामुळे पाऊण तास मुंबईची लोकल थांबली होती. 


या सगळ्याचे कारण म्हणजे पनवेल इथे शनिवारी दुपारी तीन वाजता मालगाडीचे काही डबे घसरले, त्यामुळे वसई ते पनवेल दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आणि उत्तरेकडून तसेच मुंबईतून कोकणात आणि दक्षिणेत जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस या वेगवेगळ्या स्थानकात थांबल्या किंवा रद्द करण्यात आल्या. मात्र मंगरूळ एक्सप्रेस रात्री उशिरा सुटणार होती तर मध्य रेल्वे प्रशासनाने अपघाताचे काम पूर्ण होणार नाही याची जाणीव असून देखील एक्सप्रेस पुढे का सोडली असा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. यामधून मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा डिसाळ कारभार समोर येत आहे, सर्व अधिकारी आज स्वच्छता पंधरावडाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, त्यांनी प्रवाशांना मात्र वाऱ्यावर सोडले होते. 


प्रवाशी संतप्त, स्टेशनवरच आंदोलन


जर पुढे मालगाडीचे डबे घसरले असल्याने मार्ग बंद आहे तर मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या पुढे पाठवल्याच का? आम्हाला काही झाले तर जबाबदारी मध्य रेल्वे घेणार का? असे संतप्त सवाल कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाला विचारले आहेत.


पनवेल आणि कळंबोली च्या दरम्यान मालकाचे डबे घसरल्यामुळे कालपासून कोकणात जाणाऱ्या गाड्या या उशिराने धावत होत्या, आज त्यातील अनेक गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको केला आहे. संतप्त प्रवाशांना बाजूला करून लोकल आणि एक्सप्रेसची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


ही बातमी वाचा: