Swachata Hi Seva : महात्मा गांधींच्या जयंतीचं (Mahatma Gandhi Jayanti) औचित्य साधून, केंद्र सरकारनं स्वच्छता हीच सेवा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. याचपार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात 'स्वच्छता हीच सेवा' उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) स्वच्छता केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवडी किल्ल्यावर (Sewri Fort) तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती (Baramati) स्वच्छता सेवा अभियानात सहभाग घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अहमदाबादेत सहभाग घेतला. दरम्यान, स्वच्छता हीच सेवा मोहीमेंतर्गत राज्यात 'एक तारीख एक तास' मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून 72 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छेतेची माहीम राबवण्यात आल्याची माहिती सीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


आज गिरगाव चौपाटी येथे सुंदर महाराष्ट्राच्या दिशेनं एक पाऊल टाकण्यात आलं. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केलं आणि स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेलं हे मोठं पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोक चळवळ झाली आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केलं.


उद्या (2 ऑक्टोबर) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानानं स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीनं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव केएच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी,अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे हे सेलिब्रिटीही उपस्थित होते.


या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. तसेच, मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगानं पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानंच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे. 


स्वच्छता कागदावर नको, मुख्यमंत्र्यांचं आवाहन 


स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा, असं होता कामा नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केलं आहे.


गड, किल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता


राज्यातल्या गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरं यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन काम केलं पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जे पन्नास साठ वर्षात जमलं नाही, ते पंतप्रधानांनी गेल्या आठ-नऊ वर्षांत केलं आणि देशात स्वच्छतेचं काम झालं, भ्रष्ट्राचाराची सफाई झाली. 


दरम्यान, गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वात आधी ग्रीनलॉन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना भेटले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या बरोबर आले होते. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचं कौतुक केलं. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थीसुद्धा स्वच्छता मोहीमेत सहभागी होण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील बोलले. आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीनं अनेक संस्था देखील सहभागी झाल्या होत्या. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल, नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नॅशनल हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीस, होमगार्ड्स, महानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहानं या मोहिमेत भाग घेतला.