नवी दिल्ली: मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यात यश मिळालं आहे. यामुळं केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचं कौतुक केलं आहे. एक वेळ होती ज्यावेळी मुंबईतील धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट होता आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येत होते. मात्र आता इथं कोरोनाच्या केसेस कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळं केंद्रानं राज्य सरकार आणि बीएमसीचं कौतुक केलं आहे.



मुंबईतल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला अजून तरी ब्रेक लागलेला नाही. मात्र, रुग्णसंख्या वाढीचा वेग बराच कमी झाल्याचं चित्र आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता जवळपास एक महिन्यापर्यंत गेलाय. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील मोठ्या प्रमाणात खाली आला आहे.

मुंबईच्या धारावीमध्ये दाट लोकसंख्या आहे. धारावीत 2,27,136 व्यक्ती वर्ग किमी असल्याने एप्रिल महिन्यात 12 टक्के ग्रोथ रेटसह 491 केसेस समोर आल्या होत्या. तर  डबलिंग रेटचा कालावधी 18 दिवसांचा होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आणि परिसरात कंटेन्मेंट झोनच्या नियमांना लागू केलं. त्यानंतर ग्रोथ रेट 4.3 टक्क्यांवरुन जूनमध्ये 1.02 टक्के झाला आहे. नियमांची सक्ती केल्यानं मे महिन्यात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 43 दिवस झाला तर जून महिन्यात तो 78 दिवसांवर गेला आहे.


धारावी सारख्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं मोठं आव्हान होतं. इथं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे इथले 80 टक्के लोक हे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. जवळपास  8-10 लोकं अशा घरात आणि झोपड्यांमध्ये राहतात जिथं 10 फुट बाय 10 फुटाच्या अंतर आहे. तसंच 2-3 मजल्यांची घरं, अरुंद रस्ते अशामुळं इथं कोरोना रोखण्याचं मोठं आव्हानं होतं. कारण याठिकाणी प्रभावी होम क्वारंटाईनची व्यवस्था करणं कठिण काम होतं आणि फिजिकल  डिस्टंसिंगचं पालन करणं तर त्याहून अवघड होतं.


अशात बीएससीने इथं 4 टी प्लान लागू केला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट. त्यानंतर प्रोअॅक्टिव स्क्रिनिंगचा निर्णय घेतला. प्रत्येक घरी जाऊन डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यांच्या मदतीनं  47,500 लोकांची स्क्रिनिंग केली.  14,970 लोकांचं मोबाईल व्हॅनच्या मदतीनं स्क्रिनिंग केलं. तर बीएमसी आरोग्य कर्मचाऱ्यांनी 4,76,775 लोकाचं स्क्रिनिंग केलं. तर इथल्या वयस्क आणि हाय रिस्क लोकांच्या तपासणीसाठी फिवर क्लिनिक स्थापन केली. यामुळं जवळपास 3.6 लाख लोकांची स्क्रिनिंग होण्यास मदत झाली. संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर तसंच क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. विशेष म्हणजे 90 टक्के रुग्णांवर धारावीतच उपचार करण्यात आले.


फक्त गंभीर रुग्णांनाच धारावीच्या बाहेर उपचारासाठी नेलं जायचं.  बीएमसीने धारावीत 25,000 रेशनचे कीट तसेच जेवण देखील पुरवलं. महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळं आव्हानात्मक असलेल्या धारावीत आज स्थिती नियंत्रणात आहे. यामुळं केंद्रानं महापालिका आणि राज्य सरकारचं कौतुक केलं आहे.