मुंबई : साल 2013 मध्ये मुंबईत बांधकाम व्यावसायिक अजय गोसालियाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं गँगस्टर छोटा राजनला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
गोसालिया यांच्यावर साल 2013 मध्ये मालाडमधील इन्फिनिटी मॉलबाहेर तीन जणांनी गोळीबार केला होता. 28 ऑगस्टमध्ये झालेल्या या हल्ल्यात गोसालिया आश्चर्यकारक पद्धतीनं बचावले होते. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मोठ्या पेडंटमध्ये हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या अडकल्या होत्या. या प्रकरणी जवळच्याच बांगूर नगर पोलीस स्थानकांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सीबीआयनं याप्रकरणी आयपीसी आणि मोक्कानुसार हत्येचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, हत्यारे बाळगणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
खंडणी न दिल्यानं छोटा राजनच्या सांगण्यावरून शूटर सतीश कालिया आणि प्रकाश निकम यांनी हा हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हे तिघेही यामध्ये फरार आरोपी घोषित होते. पत्रकार जे डे हत्याप्रकरणात निकम आणि कालिया यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आल्यावर गोसालिया हल्ला प्रकरणात त्याला अटक दाखवण्यात आली होती.
सीबीआय न्यायालयानं याप्रकरणी तिघांनाही दोषी ठरवत त्यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी आठजणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. राजनला पाच लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. यापूर्वी पत्रकार जे डे हत्या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली आहे.