मुंबई : राज्यात वाढता कोरोना आणि सध्या चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारमध्ये जोरदार खलबतं सुरु आहेत. वर्षा बंगल्यावर काल रात्री साडेबारापर्यंत बैठक सुरु होती. आज देखील हा बैठकांचा सिलसिला सुरुच आहे. काल रात्री  मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली. तर आज देखील गृहमंत्री अनिल देशमुख वर्षा बंगल्यावर दाखल झाले. आज पुन्हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे.  सोबतच मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील वर्षावर दाखल आहेत. 


'सह्याद्री'वर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक
दुसरीकडे 'सह्याद्री' अतिथीगृहावर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदि उपस्थित होते.  बैठकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 31 मार्च पर्यंत काय कामं प्राधान्याने करायची याबाबत आज चर्चा झाली.  सचिन वाझे प्रकरणी आज बैठकीत चर्चा झाली नाही.  समन्वय समितीच्या बैठक होत असतात, असं ते म्हणाले. शिंदे यांना मुंबई पोलीस आयुक्त बदलीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, ते अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. ते  निर्णय घेतील. 


राज्यातील कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या ही चिंताजनक
केरळ, पंजाब आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या ही चिंताजनक पातळीवरती पोहोचली आहे. एबीपी माझाने 8 मार्च ते 15 मार्च या आठवड्याचे देशाचे विश्लेषण केले. त्यामध्ये महाराष्ट्रात अनेक बाबतीमध्ये आघाडीवर आहे हे दिसून येत आहे. देशाच्या तुलनेत केरळ आणि महाराष्ट्राची मिळून सात ते आठ टक्के लोकसंख्या होते. पण या दोनच राज्यांमध्ये मिळून देशाच्या 60 ते 70 टक्के रुग्ण आहेत. गेला महिनाभरामध्ये देश पातळीवरती एकूण कोरोना रुग्णसंख्येमध्ये  30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर 28 टक्के मृत्यू वाढले आहेत. देशांमध्ये रोज सुमारे तीस हजार नवे रुग्ण नोंदवले जात आहेत. परंतु या तीन राज्याची तुलना केली तर महाराष्ट्र अनेक पातळीवर ती आघाडीवर आहे. रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या दरामध्ये मात्र महाराष्ट्र आघाडीवरती आहे असे दिसत आहे.