मुंबई : एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही, सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे प्रकरणावर राज्य मंत्रिमंडळात काहीही घडामोडी घडत नाहीयेत. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, पुढील साडेतीन वर्ष सरकार पडणे शक्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार पडेल किंवा सरकार अस्थिर झालं या भ्रमातून सगळ्यांना बाहेर पडावं. एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही. सरकार पुढचे साडेतीन वर्ष चीतपट करणे कुणालाही जमणार नाही. या प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस तपास करत आहे. केंद्रीय संस्था तपास करत असताना त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. मात्र त्यावर आमचं लक्ष आहे. कॅबिनेट बैठका सचिन वाझे प्रकरणामुळे होत नाहीयेत, सचिन वाझे प्रकरण ही लहान गोष्ट आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत होते. मात्र एखादी व्यक्ती आधी शिवसेनेशी संबधित असेल तो काय गुन्हा नाही. शिवसेना बंदी घातलेली संस्था नाही. प्रत्येक मराठी माणून कधीनाकधी शिवसेनेशी संबधित असतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं. राज्यात खातेबदलाच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातली निर्णय असतो. मात्र सरकार तीन पक्षांचं असल्याने तीन पक्षाचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतात. त्यावर मी बोलणे योग्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितल.
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
गेल्या काही दिवसात अनेक प्रकरणांमध्ये पाहिले गेलं आहे की एनआयए किंवा केंद्रीय संस्थांना अटकेची घाई असते. ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथे जाऊन कारवाई करण्याचा छंद काही लोकांना जडला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही आपण ते पाहिलं आहे. ईडी प्रकरणात अनेकदा पाहिलं आहे. महराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्येही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.