मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी याच्या पत्नीविरोधात मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गायक अंकित तिवारीचे वडील आरके तिवारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मॉलमध्ये विनोद कांबळीच्या पत्नीने मारहाण केल्याप्रकरणी आरके तिवारी यांनी मुंबईतील बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये रविवारी (1 जुलै) तक्रार नोंदवली.

मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये रविवारी विनोदची पत्नी अँड्रियाला एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. अँड्रियाने अंकित तिवारीच्या वडिलांवर आरोप केला. मात्र अंकित तिवारीचा मोठा भाऊ अंकुरने विनोद आणि त्याच्या पत्नीवर विनाकारण मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यानंतर त्यांनी बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

विनोद कांबळीचा आरोप
विनोद कांबळीच्या आरोपानुसार, रविवारी आपण कुटुंबासह मालाडमधील इनऑर्बिट मॉलच्या गेम झोनमध्ये होते. त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मग त्या व्यक्तीसोबत आणखी दोन पुरुष आले आणि माझ्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना मागे हटण्यास सांगितलं. मात्र आम्ही कोण आहोत, हे तुला माहित नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. कांबळीने या घटनेबाबत ट्वीट केलं, त्यानंतर वांद्रे पोलिस स्टेशनमधील एक अधिकारी त्याच्या घरी पोहोचला.

वडिलांना ठोसा मारला, अंकितच्या भावाचा आरोप
दुसरीकडे अंकित तिवारीचा मोठा भाऊ अंकुर तिवारीने सांगितलं की, "माझे 59 वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी माझ्या मुलीला घेऊन इनऑर्बिट मॉलच्या गेम झोनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी विनोद कांबळीला पाहिलं आणि त्याच्या बाजूला असलेल्या एका महिलेच्या शेजारुन गेले असता, तिने वडिलांना ठोसा मारला.

बराच वेळ ते सावरु शकले नाही. कोणीतरी आपल्याला ठोसा मारलाय, यावर त्यांना विश्वासच बसला नाही आणि एक महिला जोरजोरात ओरडत, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांच्यावर करत होती. मी वडिलांना महिलेला ओळखण्यास सांगितलं, तर ती कांबळीची पत्नी असल्याचं समजलं."

आरके तिवारी यांनी विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केल्याच्या वृत्ताला, बांगूरनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विनय बने यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून योग्य कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. सध्या पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.