मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात असलेल्या वेस्टर्न इंडिया मिल चाळीत एका घराची जमीन खचली आहे. जमीन खचल्याने 15 ते 20 फूट खोल खड्डा याठिकाणी पडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक घर पूर्णतः खचलं असून मोठा खड्डा तयार झाला आहे. या परिसरातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.


मुंबई महानगरपालिकेकडून या विभागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी मोठ्या मशीनच्या साहाय्याने जमिनीत खोदकाम सुरु आहे. खोदकामामुळे जमिनीला हादरे बसून जमीन खचत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना ऐन पावसात भीतीनं बाहेर बसण्याची नामुष्की ओढावली  आहे.


काही दिवसांपूर्वी याच परिसरात घरातील जमीन खचल्याचा प्रकार घडला होता. जमीन खचल्याने पडलेल्या खड्ड्यात 4 जण अडकले होते. स्थानिकांनी आणि पोलिसांनी शिडी आणि दोरीच्या साहाय्याने या चौघांना खड्ड्याबाहेर काढले होते. सुदैवाने दोन्ही घटनेती कोणतीही जीवितहानी झालेली नाही, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.


संबधित बातम्या



काळाचौकी येथे चाळीतील घर खचले ; ४ जण थोडक्यात बचावले