विधानसभेत आज मांडण्यात आलेल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई का तुंबते, याची उत्तरं कॅगने आपल्या अहवालात समोर आणली आहेत.
कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेवर कोणते ताशेरे ओढण्यात आले?
- मुंबईत बांधण्यात आलेली गटारं सपाट बांधण्यात आल्याने भरती, ओहोटीचा त्यावर परिणाम होतो
- गटारे प्रचंड गाळाने भरलेली आहेत
- पाण्याचा विसर्ग करणारी नलिका समुद्र पातळीच्या बरीच खाली आहे
- 45 विसर्ग नलिकांपैकी केवळ तीन ठिकाणी पूराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत. त्यामुळे या तीनच ठिकाणच्या भरतीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते
- 25 मिमी प्रतितास पावसासाठीच मुंबईतील गटारांची क्षमता
- मोठ्या नाल्यांमध्ये केबल्स, पाईपलाईन अडथळा ठरतात
- नाल्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष
- छोटे नाले अयोग्य जागी असणे आणि प्रभावी नसणे
- नाल्यांची अयोग्य रचना
भूस्खलनाच्या घटना घडूनही ठोस उपाय नाही
मुंबईत 2015 ते 2017 या कालावधीत 33 भूस्खलनाच्या घटना घडल्या, ज्यात 12 जण जखमी झाले होते. मात्र या घटना वारंवार घडूनही भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. याबाबत 'जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडिया'च्या अहवालात भूस्खलनावर उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिला होता. मात्र या अहवालाकडे महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे.
प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी
मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. विधानसभेत आज मुंबईत साचलेल्या पाण्याचा प्रश्न चर्चेत आला. अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेना हा प्रमुख सत्ताधारी पक्ष राहिला आहे. तरीही दरवर्षी मुंबई पाण्यात जाते. त्यामुळे आजवरच्या मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी का होऊ नये, असाही प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.