मुंबई : मुंबईत काल (सोमवारी) रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा झाला. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे शाळा, कॉलेजांसह सरकारी आणि बहुतांश खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. दिवसभर पावसाने उसंत घेतल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनी महापालिकेच्या कारभारावर यथेच्छ ताशेरे ओढले, मात्र मुंबईतील सहा पंम्पिंग स्टेशन्सनी 14 हजार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडल्याची माहिती आहे.


मुंबई परिसरात साचलेलं 14 हजार दशलक्ष लीटरपेक्षा अधिक पाणी महापालिकेच्या सहा पंम्पिंग स्टेशन्समधून समुद्रात फेकून देण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवरुन व्हिडिओ शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे. समुद्रात सोडण्यात आलेल्या पाण्याची क्षमता ही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तुलसी आणि विहार तलावाच्या एकत्रित क्षमतेपेक्षा जास्त असल्याचा दावा बीएमसीने केला आहे.


दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पर्जन्य जलाचा साठा केला जात नसल्याची झोड नेटिझन्सनी ट्विटरवर उठवली आहे. पाण्याचा निचरा समुद्रात करण्याऐवजी हे पाणी साठवलं असतं, तर त्याचा भविष्यात लाभच झाला असता, असं मत ट्विटरवर व्यक्त केलं जात आहे. एकीकडे, मुंबईची लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात जलसाठे वाढलेले नाहीत. त्यामुळे उपलब्ध स्रोतांवरील ताण आधीच वाढत असताना, पाणी फेकून देणं चुकीचं असल्याची ओरड केली जात आहे.








मुंबईत पावसाने उघडीप घेतलेली असली तरी संध्याकाळ होऊनही रेल्वे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत आहे. मुंबईकरांनी घरीच बसणं पसंत केल्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी आहे. मात्र मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.