मुंबई : मलबार हिल हा दक्षिण मुंबईतला उच्चभ्रूंचा म्हणून ओळखला जाणारा तसेच राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परिसर. इथेच राज्याच्या राज्यपालांचे निवास असलेलं राजभवनसुद्धा आहे. राज्यपालांच्या या निवास्थानाच्या खाली ब्रिटीशकालिन ऐतिहासीक ठेवा सापडला आहे. तब्बल सव्वाशे वर्षे जूनी असणारी 15000 चौरस फुट जागेतली भलं मोठे भुयार (गुहा/बंकर) या राजभवनच्या आवारात आढळून आलं आहे.


या भुयारात गेल्यानंतर एखाद्या सस्पेन्स फिल्मच्या सेटवर असल्याचाच भास होतो. मजबूत बांधणी, चकवे देणारी वळणं आणि निमुळती वाट यामुळे या भुयारात फिरताना एका वेगळ्याच युगात गेल्याचा भास होतो.

भुयाराची रचना आणि 13 वैशिष्ट्यपूर्ण कक्ष
या भुयारात आतापर्यंत एकूण 13 कक्ष सापडले आहेत. लहान, मोठ्य़ा आकाराच्या या खोल्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. या कक्षांना शेल स्टोअर, गन शेल, काडतूस भांडार, शेल लिफ्ट अशी त्याकाळात दिलेली नावंही आढळून आली आहेत.

भुयाराचा शोध लागला कसा?
राजभवनाच्या हिरवळीखाली तीन वर्षांपूर्वी स्वत: राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशावरुन गुहेचा शोध घेतला गेला. त्याआधी अनेक वर्ष याठिकाणी एखादे भूयार असावे अशी चर्चा होती. ही चर्चा राज्यपालांनी ऐकली. आणि जून्या कर्मचाऱ्यांकडून माहितीदेखील घेतली. कुतूहल आणि सुरक्षेच्या दृष्टीने शंकानिवारण म्हणून खोदकाम सुरु झालं आणि त्यानंतर ही गुहा आढळली. त्यानंतर राज्यपालांनी तत्काळ गुहेचे जतन करण्याचे निर्देश सरकारला दिले. ही ब्रिटीशकालीन गुहा आहे. पण, अनेक दशके माहीत नसल्याने दुर्लक्षित झाली होती. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे ती स्थापत्यदृष्ट्या कमकुवत झाली होती. परंतु तिचे दुरुस्तीद्वारे बळकटीकरण करण्यात आले आहे.

ब्रिटिशांचे तंत्रज्ञान
सुमारे सव्वाशे वर्षे जुन्या या गुहेत (भुयारात) त्याकाळी ब्रिटिशांनी पाण्याचा निचरा होण्याची सोय केल्याचे दिसते. तसेच, नैसर्गिक प्रकाश व शुद्ध हवा मिळावी अशीही विशेष रचना त्यात आहे. ही गुहा उघडली गेली त्यावेळी तेथील विविध खोल्यांना लष्करी सामग्रींची नावे असल्याचे दिसले. यावरून ही गुहा त्यावेळी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट होते.

संग्रहालय असं असणार...
ही गुहा जतन करतानाच त्याचा सर्वसामान्य नागरिकांना आस्वाद घेता यावा यासाठी तेथे संग्रहालय उभारण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या भुयाराचा नेमका उपयोग काय होता? तेथील कामे कशी चालायची? याची माहिती ऑडीओ व्हिज्युअल माध्यमातून दिली जाणार आहे.

आव्हाने काय होती?
या गुहेच्यावर राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली 'जलभूषण' ही वास्तू आहे. त्यामुळे हे आगळे असे भूमिगत संग्रहालय सर्वसामान्यांसाठी सुरु करताना सुरक्षेची खबरदारी बाळगणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा येथे उभ्या करण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्यांसाठी ही गुहा कधी खुली होणार?
गुहेतील भूमिगत संग्रहालय अद्याप सर्वसामान्यांसाठी सुरु झालेले नाही. परंतु, लवकरच राज्य सरकार ते सर्वांसाठी खुले करणार आहे. त्यासाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय असेल. त्याद्वारेच येथे प्रवेश दिला जाईल.

गुहेची वैशिष्ट्ये
एकूण 15 हजार चौरस फूट क्षेत्रफळ
एकूण 13 विविध आकाराच्या खोल्या
20 फूट उंच प्रवेशद्वार
किल्ल्याप्रमाणे भासणारी आकर्षक वास्तू

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीतलं हे महत्त्वाचं ठिकाण. बाँम्बे प्रसिडेंसी राज्याच्या काळात समुद्र किनाऱ्यावर संरक्षणाच्या दृष्टीनं हे भुयार तयार करण्यात आलं असावं. तिथे तोफाही तैनात केल्या गेल्या. हे भुयार पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीच तयार केलं गेलं असावं, तसेच पहिल्या महायुद्धात या भुयारातल्या दारुगोळ्याच्या साठ्य़ाची इंग्रजांना मदत झाली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. जवळ जवळ 300 वर्षांचा इतिहास असणारं इथलं त्याकाळचं गव्हर्नमेंट हाऊस आज आपल्या काळात राजभवन नावानं ओळखलं जातंय खरं पण, त्याच्या वाटेवाटेवर इतिहासानं मागे सोडलेल्या पाऊलखूणा आजही लख्ख आहेत.