ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातुन 'ऑक्सिजन प्लांट' उभारला असून त्याचे लोकार्पण पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आज पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'ऑक्सिजन प्लांट'मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली. हा 'ऑक्सिजन प्लांट' पुढील 3 ते 4 दिवसात लोकार्पण झाल्यानंतर दररोज 120 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती त्यातून होणार आहे. मीरा भाईंदरमधील नागरिकांना हे 'ऑक्सिजन सिलेंडर' शिवसेनेतर्फे मोफत दिले जाणार आहेत, असे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा भव्य व अत्यंत उपयोगी असा प्लांट उभारला गेला आहे. मीरा भाईंदर येथे मीरा रोड , मंगल नगर , हटकेश येथे प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. आज 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी ऑक्सिजन प्लांटचे प्रात्यक्षिक झाले. हा ऑक्सिजन प्लांट कसा चालेल , कसे हवेतून ऑक्सिजन निर्माण करून ते सिलेंडरमध्ये भरले जाईल याचे प्रात्यक्षिक आज दाखविण्यात आले. यावेळी आमदार सरनाईक यांच्यासह मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, तहसीलदार नंदकुमार देशमुख व मीरा भाईंदर महापालिकेचे इतर अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक झाले. आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे कौतुक करतानाच यामुळे शहरातील नागरिकांचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. आमदार सरनाईक यांनी हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यामागील संकल्पना प्लांटची माहिती अधिकाऱ्यांना दिली. 


उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार लोकार्पण


आमदार सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे. या प्लांटचे काम पूर्ण झाले असून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते लवकरच ऑनलाईन पद्धतीने या ऑक्सिजन प्लांटचे म्हणजेच प्राणवायू प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे इतर सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर दिवस रात्र हा प्लांट मीरा भाईंदरमधील जनतेला सेवा देईल , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. यावेळी मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त , वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते.


म्हणून उभारला ऑक्सिजन प्लांट' 


ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक शहराने स्वयंपूर्ण होण्याची गरज असून ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही नागरिकांना यापुढे ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून आमदार सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरात ऑक्सिजन निर्मिती करणारा कायमस्वरूपी प्राणवायू प्रकल्प (प्लांट) उभारला आहे. 2 महिन्यापूर्वी या ऑक्सिजन प्लांटची ऑर्डर सरनाईक यांच्याकडून देण्यात आली होती. परदेशातून हा प्लांट मीरा भाईंदरमध्ये आला आहे. एखाद्या आमदाराने आपल्या मतदारसंघासाठी स्वतः कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा हा पहिला प्रयोग आहे. कमीत कमी  जागेत हा प्लांट बसविण्यात आला असून 24 तास त्यातून ऑक्सिजन मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक ते ऑपरेटर व हेल्पर यांची नेमणूक केली गेली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून मिळणारे ऑक्सिजन नागरिकांना मोफत दिले जाणार आहे. या प्लांटमधून 120 सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे. खाली सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे.