नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा येथे डोंगर कोसळल्याने 200 पर्यंत लोकांचे जीव गेले. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबईत शहरात होण्याची दाट शक्यता आहे. शहराच्या पुर्वेला असलेल्या पारसिक हिल डोंगररांग दगडखाणीने पोखरल्याने 50-60 हजार कुटुंबांचे जीव टांगणीला लागले आहेत.


मुसळधार पडलेल्या पावसामुळे रायगड, रत्नागिरीमध्ये डोंगराचे भूस्खलन झाल्याने निष्पाप लोकांचे जीव गेले. डोंगराखाली वसलेल्या गावांवर दरड पडल्याने गावच्यागावं नामशेष झाले. मुंबईतही अशाच प्रकारच्या घटनेत लोकांचा नाहक जीव गेला. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबई शहरात होण्याची दाट शक्यता आहे. नवी मुंबई शहराच्या पुर्वेस असलेल्या 25-30 किलो मीटर पारसिकहिल डोंगररांगाच्या पायथ्याशी हजारो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. 50 ते 60 हजार गरीब परिवार या डोंगरपायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. जोरदार पाऊस सुरू झाल्यावर आपणास झोप येत नसल्याचे येथील लोक सांगतात. कधी डोंगर कोसळेल आणि आमचा जीव जाईल याची शास्वती नसल्याने पावसाळ्यात रात्र जागून काढावी लागत आहे. महानगर पालिका झोपडपट्टी पुर्नविकास योजना लागू करत नसल्याने आम्हाला डोंगराचा सहारा घ्यावा लागत असल्याचे येथील लोक सांगतात.


नवी मुंबईतील पारसिक हिल डोंगर रांगांचे अस्तित्व दगडखाणीने नष्ट करत आणले. संपुर्ण डोंगर पोखरले गेले आहेत. दगडखाणींमुळे मोठ्या प्रमाणात डोंगरांचे नुकसान झाल्याने याचा परिणाम भूस्खलनावर होऊन जीवितहानी होऊ शकते. यामुळे अशा ठिकाणी महानगरपालिकेने झोपडपट्टी न वसवता झाडे लावून डोंगरांची निघा करावी, अशी मागणी पर्यावरण तज्ञांकडून होत आहे.


नवी मुंबईत 1 लाखाच्या वर झोपडपट्यांची संख्या वाढली असून याला महानगरपालिका कारणीभूत आहे.  झोपडपट्टी धारकांसाठी एसआरए योजना लागू केली जात नसल्याने  गरीब लोकांना डोंगराखाली जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली असल्याचा आरोप समाजसेवकांनी केलाय.