मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत मुलुंडची एक महिला ओला चालक मुंबईत अडकून पडलेल्या दिव्यांग, महिला आणि गरजू लोकांना आपली सेवा देत आहे. प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप आणि सुरक्षित पोहचविण्याचे काम करत आहे. मुलुंडच्या जिगरबाज वाघिणीचे नाव आहे, विद्या अनिल शेळके. मुंबई-नाशिक, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-पुणे, मुंबई-कोल्हापूर, असा लांब पल्याचा प्रवास देखील ती करत आहे.
हातात स्टेरिंग आणि मनात जिद्द बाळगून मुलुंडची विद्या शेळके महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर वा-याच्या वेगाने आपली कार घेऊन धावत आहे. ध्येय एकच लॉकडाऊनच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या महिला, वृद्ध आणि विकलांग लोकांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्याचं. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रावर आलेल्या संकटात आपलही काही योगदान असावं. या हेतूने विद्या सेवा देत आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी विद्या फेसबुक, टिकटॉक आणि अन्य सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करते. त्या माध्यमातून अनेकांनी विद्याशी संपर्क साधून मदत मागितली आहे.
विद्याने या प्रवासाच्या काळात ज्यांना ज्यांना सुखरूप घरी सोडलं त्या महिलांच्या अनेक कहाण्या ऐकलेल्या आहेत. या कहाण्या अत्यंत वेदनादायी होत्या, असेही विद्या सांगते. विद्याला 5 दिवसा अगोदर नाशिकवरुन एका महिलेने संपर्क केला. त्या महिलेला मुंबईतील महालक्ष्मी इथं जायचं होत. त्या महिलेच्या पतीने मुलांसहीत तिला लॉकडाऊनमध्ये घराबाहेर काढले होते. यासंबंधित महिलेने नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. लॉकडाऊनमध्ये दोन मुलांना घेऊन तिला माहेरी जायचं होतं. तिने सोशल मीडियावरून विद्याला संपर्क केला. विद्याने तिला नाशिकहून सुखरूप माहेरी पोहोचवले. तसेच या लॉकडाऊन काळात मुंबईत अडकलेल्या अनेक गरोदर महिला, दिव्यांग नागरिक आणि वृद्ध कुटुंबियांना सुरक्षित घरी पोहचवले आहे.
कोरोनाचा वेग आटोक्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी : सर्व्हे
फिजिकल डिस्टन्सचे पालन
विद्या ओला चालकाचे काम करताना ती फिजिकल डिस्टन्सचे पालन करत आहे. प्रवाशांना सॅनिटाझर, मास्क आणि इतर सुरक्षेच्या गोष्टी ती तिच्या वाहनात ठेवते. तसेच दोन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात नाही. प्रवाशांची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी ती स्वतः घेते.
आपलं कर्तव्य म्हणून विद्या रस्त्यावर
औरंगाबाद जिल्हातील उंदिरवाडी या छोट्याशा गावात विद्याचा जन्म झाला. कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची. काबाड कष्ट करून दहावीपर्यंतचे शिक्षण विद्याने घेतले. 2009 मध्ये तिचा विवाह अनिल शेळके यांच्याशी झाला. हे दाम्पत्य सध्या मुंबईतील मुलुंडमध्ये वास्तव्याला आहे. विद्याचे पती शेतमालाची वाहतूक करतात. विद्याला 10 वर्षांचा आदी हा मुलगा आणि 8 वर्षांची आरोही नावाची मुलगी आहे. पतीच्या मिळकतीवर संसाराचा गाडा चालविणे अवघड जात असल्याने विद्याने स्वतः रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावण्याचे ठरवले. 2015 ला ती रिक्षा चालवायला लागली. मात्र, या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असल्यामुळे अनेक अडचणी विद्याला येत होत्या. त्यामुळे कर्ज घेऊन तीने ओला टॅक्सी घेतली. त्यानंतर 2016 पासून ते आजपर्यंत विद्या ओला चालवत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स, पॅरामेडिकल टीम पोलीस इतर कर्मचारी यांच्या बरोबरच विद्या शेळकेचेही काम वाखाणण्याजोगं आहे. एका बाजूला इतर टॅक्सीचालक कोरोना काळात घरात बसून आहेत. तर विद्या आपलं कर्तव्य म्हणून रस्त्यावर उतरून ही सेवा देत आहे. या धाडसाला नक्कीच वाघिणीचं काळीज लागतं.
सात वर्षाच्या चिमुकल्याचे वाचले प्राण, खेळताना तोंडात गेलेलं नाणं काढण्यात यश
समाजाला माझ्या मदतची गरज : विद्या
कोरोनाच्या संकट काळात समाजाला माझ्या मदतची गरज आहे, याची मला जाणीव झाली. मी माझ्या मुलांना गावी आई-वडिलांकडे सोडून आले. गेल्या दोन महिन्यांपासून गरजू नागरिकांना शहरातून घरी पोहोचविण्याचे काम करत आहे. कारण हे माझं कर्तव्य असून या संकट काळत मदत म्हणून सेवा देत आहे. लॉकडाऊन काळात अनेक अडचणी येतात. मात्र, माझा या चांगल्या कार्याला पोलिसांकडून आणि नागरिकांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे हे कार्य करणे शक्य होत आहे. असं ही विद्या ने सांगितले आहे.
Covid Hopsital | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात 300 खाटांचं हॉस्पिटल