मुंबई : शहापूरला राहणाऱ्या एका सात वर्षाच्या चिमुरड्याला केईएम रुग्णालयातील डॉक्टरांमुळे जीवनदान मिळालं आहे. प्रेम वानखेडे असं या चिमुरड्याचं नाव आहे. प्रेम घरात खेळत असताना चुकून त्याच्या तोंडात एक रुपयाचं नाणं गेलं.  ही बाब लक्षात आल्यानंतर प्रेमच्या आईवडिलांनी प्रेमला जवळ असलेल्या राजीव गांधी मेडिकल हॉस्पिटल आणि आरजीएमसी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु डॉक्टरांनी एंडोस्कोपी नसल्याचं कारण देत रुग्णाला दवाखान्यात घेणं टाळलं. अखेर मध्यरात्री तीन वाजता प्रेमला शहापूरवरून मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं. केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनीदेखील कोरोना व्हायरसचा धोका पत्करत प्रेमवर शास्त्रक्रिया केली.


जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी प्रेमच्या पोटात गेलेलं नाणं काढलं. सध्याचा कोरोनाचा वाढता धोका पाहता रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची टेस्ट करण्यात येत आहे त्यामुळे प्रेमचीसुद्धा कोव्हिड 19ची टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहेत. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर प्रेमवर उपचार केलेल्या सर्व डॉक्टरांना क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे. ही अवघड शस्त्रक्रिया इएनटी सर्जन डॉक्टर नीलम साठे यांनी केली आहे. त्यांचं आणि त्यांच्या टीमचं  विशेष कौतुक होत आहे.


याबाबत बोलताना डॉ. नीलम साठे म्हणाल्या की, सध्या केईएम रुग्णालयातील आम्ही सर्व डॉक्टर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहोत. कोरोनाचे अनेक रुग्ण केईएम रुग्णालयात दाखल आहेत. अशा परिस्थितीत काल रात्री उशीरा प्रेम वानखेडेला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती. परिस्थितीचं भान राखत आम्ही तात्काळ प्रेमवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर प्रेमच्या पोटात गेलेलं एक रुपयाचं नाणं बाहेर काढलं. आता प्रेमची तब्येत स्थिर आहे. आम्ही प्रेमची कोव्हिड 19ची टेस्टसुद्धा करून घेतली आहे. जर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आम्हां सर्व डॉक्टरांना कॉरंटाईन व्हावं लागणार आहे. परंतु आम्हां सर्वांना प्रेमचा जीव वाचवला यात आनंद आहे.


चारही दिशांनी कोरोनाचा हा विळखा असताना रुग्णालयात सर्वाधिक प्रमाणही कोरोनाच्या रुग्णांचं आहे, अशातच डॉक्टरांना मात्र इतर रुग्णांकडेही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. काही रुग्णालयांमनध्ये कोरोनाच्या भीतीने इतर आजार असलेल्या रुग्णांना नाकारलं जातंय, मात्र केईएम रुग्णालयाने या भीतीने न घाबरता प्रेमवर तात्काळ उपचार केले आणि त्याचा जीव वाचला.