मुंबई: मागील काही दिवस मंदीच्या छायेखाली असलेल्या सेन्सेक्सने आज शेअर बाजारात उसळी मारली आहे. भारताची अर्थव्यवस्था नियंत्रणात आणण्याकर्ता केंद्र सरकारने काही योजना जारी केल्या. या योजनांचा हा परिणाम असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 792.96 अंशांनी वाढला असून 37,494.12 वर पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 228.50 अंशांनी वाढला, निफ्टी 11 हजारांहून 11 हजार 70 अंशांवर पोहोचला आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्थिक मंदीचा मुद्दा मांडला, भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत असल्याचं त्यांनी म्हटलं. मंदीवर मात करण्यासाठी याच पत्रकार परिषदेत काही योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. शेअर बाजारातील आजच्या उसळीमागे या योजना कारणीभूत असू शकतात. आज शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा बॅंकिंग आणि अर्थक्षेत्रालादेखील गती मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचं व्यापार युद्ध हेदेखील शेअर बाजाराच्या उसळीमागील एक कारण असल्याचा अंदाज आहे.
आजच्या शेअर बाजारातील हाईकनंतर सोन्याच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमतीत तब्बल 416 रुपयांची प्रतितोळा वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 39 हजार 181 रुपये इतका झाला आहे. येणाऱ्या काही दिवसात सोनं प्रतितोळा 40 हजाराचा टप्पा ओलांडण्याचीही संभाव्यता आहे.