मुंबई : साल 2011 मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप ढोकालिया (Pradeep Dhokalia) यांच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याच्या खटल्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा (dawood ibrahim)हस्तक प्रवीण मिश्रा उर्फ सचिनसह दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) कायम ठेवली आहे. 


कोरोना काळात लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, बकरी ईदनिमित्त गुरांच्या कत्तलीत वाढ करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली


ढोकालिया यांचे सुरक्षारक्षक अजित येरुणकरच्या हत्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) प्रवीण मिश्रा उर्फ सचिन आणि त्याचा साथीदार अभिषेक सिंह उर्फ हर्षू यांना जन्मठेप आणि साठ हजार रुपये दंड सुनावलेला होता. याविरोधात या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात ( High Court) दाद मागत याचिका केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या खटल्यातील साक्षी पुरावे आणि इतर कागदपत्रं पाहता सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्य असून यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असं मत नोंदवत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे.



या खटल्यात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांनी दिलेली जबानी याप्रकरणी न्यायालयाने ग्राह्य धरली. मात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबानीत विसंगती आहे, असा बचाव आरोपींकडून करण्यात आला होता. मात्र हायकोर्टानं हा युक्तिवाद अमान्य केला. मरीन लाईन्समध्ये परिसरात असलेल्या ढोकालिया यांच्या कार्यालयात आरोपी 8 फेब्रुवारी 2011 रोजी अचानक घुसले होते. त्यावेळी तिथं रिसेप्शनिस्ट, मॅनेजर आणि दोन सुरक्षा रक्षक उपस्थित होते. आरोपींनी तिथं हवेत गोळीबार केल्यांनंतर पिस्तुलाची एक गोळी येरुणकर यांनी चुकविली पण दुसरी गोळी त्यांच्या शरीरात शिरली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.