मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयानं त्यांना 2 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिलेत. सुनावणीदरम्यान, चौधरी यांच्याकडून न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला. आपल्याला न्यायालयीन कोठडीत असताना घरातील जेवणाचा डबा व सोबत काही वैयक्तिक गोष्टींही देण्यात याव्यात, अशी मागणी चौधरी यांच्याकडून या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. यावर गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.


एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. 


या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर अटक केली होती. त्यानंतर चौधरी यांना न्यायालयाने 20 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मंगळवारी कोठडी संपत असल्याने चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा, त्यांची 2 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.