मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनस पोलीसांच्या हद्दीत विजय सिंग या तरूणाच्या कोठडी मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र या याचिकेवर सुट्टीकालीन कोर्टाचे न्यायमूर्ती के. के. तातेड यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत नियमित खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
वडाळ्यात घडलेल्या एका हाणामारीच्या घटनेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विजय सिंग या मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हला पोलीस ठाण्यात अस्वस्थ वाटू लागलं, मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याचे गंभीर पडसाद उमटत वडाळ्यात मंगळवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी विजयची तक्रार देणाऱ्या युगुलावरही गुन्हा दाखल केलाआहे. पोलीस ठाण्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक असल्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेले असतानाही अजून त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या न्यायालयीन आदेशाचे सरळसरळ उल्लंघन झाले आहे, याशिवाय कोठडीत मृत्यूमुखी पडणाऱ्या आरोपींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असा दावा करत अॅड. अरविंद तिवारी यांनी हायकोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे.
विजय सिंगच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करा : नवाब मलिक
वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली. विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस कस्टडीमध्ये मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही आमदार नवाब मलिक यांनी केली. दरम्यान विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, वडाळा ट्रक टर्मिनल ठाण्यात विजय सिंग या तरुणाचा पोलिस कस्टडीमध्ये मारहाणीत मृत्यू झाला. मात्र मारहाणीनंतर त्याला उपचार करण्यासही टाळाटाळ करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यामुळेच विजय सिंग या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि विजय सिंग याच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
वडाळा पोलीस कोठडीत तरूणाच्या मृत्यू प्रकरणी याचिका, तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2019 09:04 PM (IST)
पोलीस ठाण्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक असल्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेले असतानाही अजून त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या न्यायालयीन आदेशाचे सरळसरळ उल्लंघन झाले आहे, याशिवाय कोठडीत मृत्यूमुखी पडणाऱ्या आरोपींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असा दावा करत अॅड. अरविंद तिवारी यांनी हायकोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -