Mumbai Metro 3: मुंबई : मेट्रो स्थानकांच्या (Metro Station) परिसरात जागाच उपलब्ध नसल्यानं कुलाबा ते सीप्झ (Colaba to Seepz) या मेट्रो-3 प्रकल्पासाठी (Metro 3 Project) तोडण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 40 टक्के झाडांचंच पुनर्रोपण शक्य आहे, असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं (Mumbai Metro Rail Corporation Ltd) हायकोर्टानं (High Court) नियुक्त केलेल्या विशेष समितीसमोर केला. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरळसरळ न्यायालयात दिलेल्या हमीचं उल्लंघन आहे, असं स्पष्ट करत हे प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे पाठवण्याचा इशारा या समितीनं एमएमआरसीएलला (MMRCL) दिला आहे.  


न्यायमूर्ती रेवती डेरे (Justice Revati Dere) आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल (Justice Sarang Kotwal) यांच्या विशेष समितीसमोर सोमवारी सायंकाळी ही बैठक हायकोर्टात पार पडली. हायकोर्टानं यावर संताप व्यक्त करत नव्यानं वृक्षरोपण करण्यासाठी चर्चगेट स्थानक आणि इरॉस सिनेमाबाहेर उपलब्ध 50 टक्के जागेवर नव्यानं वृक्षरोपण करण्याचा विचार करा, अशी सूचना महापालिका आणि एमएमआरसीएलला यावेळी केली.


प्रकरण नेमकं काय? 


प्रकल्पातील स्थानकांचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तोडण्यात आलेल्या झाडांचं त्याच जागी पुनर्रोपण करण्याची हमी एमएमआरसीएलनं यापूर्वी न्यायालयाला दिली होती. तसेच, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अन्य ठिकाणी पुनर्रोपित केलेल्या झाडांची काळजी घेण्याची हमीही एमएमआरसीएलनं दिली होती. यावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयानें दोन न्यायमूर्तींची एक द्विसदस्यीय समिती स्थापन केली होती.


मुंबईकरांची मेट्रो कशी असणार?


मुंबईकरांनी मेट्रो ही भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. सध्या या मेट्रोचा 5 ते 10 किमीचा ट्रायलरन करण्यात येतोय. दरम्यान मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आलीये. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो  ड्रायव्हरलेस असणार आहे. 


मेट्रोच्या स्थानकांचं जवळपास 100 टक्के काम पूर्ण झालंय. मेट्रोत प्रवेशाकरता फलाटावरच फुल स्क्रीन डोअर असणार आहे. रुळांवरचे अपघात किंवा आत्महत्येची 0 टक्के शक्यता यामध्ये असणार आहे. तसेच ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर,सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांनी अद्यायावत असतील. मेट्रोच्या फलाटावर लिफ्टची सोय करण्यात आलीये. दिव्यांगांकरता विशेष शौचालय, बेबी डायपर चेंजींग रुम मोफत इंटरनेट,  वायफाय सुविधा  देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


मेट्रो 3 ची वैशिष्ट्य


या मेट्रो 3 मुळे  साडेचारलाख वाहनफेऱ्या दरदिवशी कमी होण्यास मदत होईल. तसेच 2031 पर्यंत ही संख्या साडेसहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामुळे अडीचलाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे 2031 पर्यंत  साडेतीन लाख इंधनाची बचत होण्यात मदत होईल. तसेच दरवर्षी 10 हजार मेट्रीक टन कर्बवायुंचं प्रमाण कमी होईल. अडीचलाख टन प्रदुषित वायू प्रतीवर्षी कमी होण्यास मदत होईल.