मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गुणगान करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करणार का? असा सवाल बॉम्बे हायकोर्टाने विचारला आहे.
संबंधित वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे पोलिसांना यासंदर्भात वारंवार तक्रार देऊनही त्याची योग्य दखल न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
हायकोर्टाने यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
15 नोव्हेंबर 2015 रोजी नाना गोडसे यांनी एक संकेतस्थळ सुरु करत त्यावर नथुराम गोडसेचं गुणगान करण्यास सुरुवात केली. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेनं गोळ्या झाडून गांधीजींची हत्या का केली? याचं सविस्तर स्पष्टीकरण या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.
हा देशद्रोहाचा प्रकार असून संबंधितांवर भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
या प्रकरणी राज्याच्या गृह विभागाकडून अहवाल मागवण्यात आला आहे. तो कोर्टापुढे लवकरच सादर करण्यात येईल, असं गुरुवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकरनं सांगितलं. यावर हायकोर्टानं या खटल्याची सुनावणी 3 मे पर्यंत तहकूब केली आहे.