अरुण गवळीने या हत्येसाठी यासाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्का अंतर्गत साल 2008 मध्ये अरुण गवळीला अटक केली होती. 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. परंतु आजच्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळत जन्मठेप कायम ठेवली.
काय होतं प्रकरण?
कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आलं होतं. गोडसेनंनंतर श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचं कबूल केलं आणि अॅडव्हान्स म्हणून 20-20 हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. याआधी 23 एप्रिल रोजी त्याचा 28 दिवसांची फर्लो सुट्टी मंजूर झाली होती. त्यानंतर तो 9 मे रोजी तुरुंगाबाहेर आला होता. 7 जून रोजी त्याची फर्लो सुट्टी संपली.