मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्ष मोठा करण्यामध्ये एकनाथ खडसेंचा वाटा मोठा आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात भाजपचं जे संघटन आज उभं राहिलं आहे, त्यामध्ये एकनाथ खडसेचं योगदान मोठं आहे. गेल्या तीस वर्षात कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागा जिंकणे शक्य झालं नव्हतं, ते भाजपने करुन दाखवलं. यामध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे. एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षात असताना अत्यंत प्रभावीपणे काम केलं. एकनाथ खडसे भाजपचे नेते आहेत. माणसं रागावतात त्यावेळी ते व्यक्त होतात. एकनाथ खडसे भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
राज्यातील भाजपचं एकूण संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केलं आहे. येत्या 2022 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे भाजपचं उद्दीष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत लहान-लहान गोष्टींचा विचार आम्ही करत आहोत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्ष, 20 डिसेंबरपर्यंत विधानसभा क्षेत्र, 25 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि 30 डिसेंबरपर्यंत मुंबईच्या अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. मुंबईचा अध्यक्ष घोषित करताना केंद्रातील एखादा नेता उपस्थित असणार आहे, असा कार्यक्रमच चंद्रकांत पाटलांनी सांगितला.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपचे प्रतिष्ठेची बनवल्याचंही दिसून येत आहे. कारण आगामी निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. भाजपच्या या संघटनात्माक बैठकीला चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, व्ही. सतीश, आशिष शेलार यांच्यासह बडे नेते उपस्थित आहेत.
सध्या मुंबई महापालिकेतील पक्षांचे संख्याबळावर नजर टाकल्यास शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे अपक्षांसह सर्वाधिक 94 नगरसेवक आहेत. त्यानंतर भाजप दुसरा मोठा पक्ष असून भाजपचे एकूण 83 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.