मुंबई : भीमा-कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी कारागृहात असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना त्यांच्या कुटुंबियांनी पाठवलेला नवीन चष्मा देण्यास तळोजा कारागृह प्रशासनाने नकार दिला. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कैद्यांना वागणूक देताना माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करा, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयानं कारागृह प्रशासनला सुनावले. तसेच कैद्यांना कारागृहात मिळणाऱ्या वागणूकीबाबत कारागृह प्रशासनासाठीही आता विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याचं मतही हायकोर्टानं यावेळी व्यक्त केलं.


शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा हे तळोजा कारागृहात आहेत. नवलखा यांचा 27 नोव्हेंबर रोजी कारागृहातून चष्मा चोरीला गेला, त्यावर नवलखा यांच्या कुटुबियांनी त्यांच्यासाठी कुरिअरने नवा चष्मा पाठवला. मात्र कारागृह प्रशासनाने तो नवलखा यांना देण्यास नकार दिला. चष्माशिवाय नवलखा सभोवतालचे काहीच पाहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत असून परिणामी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचा दावा त्यांच्या पत्नी साहाबा हुसेन यांच्या सहीनिशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात केला आहे. मंगळवारी याची दखल न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने घेतली. नवलखा यांचा चष्मा तुरुंगात चोरीला कसा गेला?, आणि त्यांच्या कुटुंबियांनी कुरिअरद्वारे पाठविलेले नवीन चष्मा घेण्यास कारागृह अधिकाऱ्यांनी नकार का दिला?, असा सवाल यावेळी खंडपीठाने उपस्थित केला. यावर अशाप्रकारे कुठल्याही कैद्याला कुरीअरद्वारे आलेल्या वस्तू देता येत नाहीत. मात्र जर कुटुंबियांनी जर स्वत: जेलमध्ये येऊन एखादी वस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली तर विचार करता येऊ शकतो, असं राज्य सरकारच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं. यावर आपण बाकी सर्व काही आपण पाळतो त्यात माणूसकी सर्वात महत्वाची आहे. इथे तिच कशी काय विसरता. माणसाच्या नेहमीच्या वापरातील अशा सर्व छोट्या वस्तू कशा काय नाकारता येऊ शकतात?, असे खडेबोल खंडपीठाने यावेळी कारागृह प्रशासनाला सुनावले.


कबीर कला मंचच्या दोन शाहिरांचीही हायकोर्टात याचिका


दुसरीकडे, सागर गोरखे आणि रमेश गायचोर या कबीर कला मंचाच्या दोघा शाहिरांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. पुण्यातील शनिवार वाड्यावर 31 डिसेंबर 2017 ला आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांची महत्वाची भूमिका आरोपही त्यांच्यावर आहे. दोघांनाही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली हे. त्यावरही मंगळवारी याच खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, गायचोर आणि गोरखे यांनी या प्रकरणातील अन्य आरोपींविरुद्ध दंडाधिकाऱ्यांसमोर जबावी देण्यास नकार दिला. या दोघांनाही एनआयएनेच अटक केल्याचा दावा त्यांच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ वकील मिहिर देसाई यांनी केला. सुरुवातीला हा खटला पुण्यातील न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता. एनआयएने चौकशीची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला. मात्र, हा गुन्हा पुण्यात घडला असल्यामुळे त्यावर पुण्यातील विशेष एनआयए न्यायालयासमोर हा खटला चालविण्यात यावा, अशी मागणीही देसाई यांनी खंडपीठासमोर केली. त्यावर बाजू मांडण्यासाठी एनआयएकडून वेळ मागण्यात आला त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी 21 डिसेंबरपर्यत तहकूब केली.


1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी तुषार दामगुडे या व्यक्तीने कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत असल्याची तक्रार दिल्यानंतर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये सागर गोरखे, रमेश गायचोर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.