मुंबई : डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस घेत आहेत एका आईचा शोध. या आईची दोन्ही मुलं कल्याण खाडीत मधोमध सापडली. ही मुलं तिथं कशी पोहचली, त्यांची आई त्यांना तिकडे का घेऊन गेली? मुलांना सोडून आई कुठे गेली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यात आहेत.


दोन चिमुरड्यांना मरणाच्या दारात सोडून त्यांची आई बेपत्ता झाली आहे. समुद्रात भरती सुरू असताना काल दुपारी मुलं कल्याणच्या खाडीत एका दगडावर धायमोकलून रडताना आढळली. मुलांचा आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्यास धावपळ सुरू केली. गणेश मुकादम या तरुणाने आणि त्याच्या साथीदाराने जीवाची पर्वा न करता खाडीत जाऊन या दोन्ही मुलांना किनाऱ्यावर आणलं. जर या तरुणांनी धाडस दाखवलं नसतं तर कदाचीत या मुलांचा जीव वाचला नसता.


यातील एक मुलगा दोन वर्षाचा आहे तर दुसरा फक्त सहा महिन्यांचा... इतक्या लहान मुलांना मरणाच्या दारात कोण सोडून गेलं असा प्रश्न गावकऱ्यांसोबत पोलिसांना देखील पडला आहे. तपास सुरू केला असता पोलिसांना याठिकाणी मुलांच्या चपलासोबत एका महिलेच्या चपला आणि एक मोबाईल आढळला. या चपला या दोन्ही मुलांच्या आईच्या असण्याची शक्यता आहे,असा संशय पोलिसांना आहे. एक आई आपल्या मुलांना अशी मरणाच्या दारात का सोडून जाईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मते त्या महिलेने खाडीत आत्महत्या केली, मात्र पोलीस खाडीत शोध घेत नाही.


या घटनेने संपूर्ण कल्याण डोंबिवली शहर हादरले आहे. एक आई असं टोकाचं पाऊल का उचलेल? आपल्या दोन्ही मुलांना, ज्यांनी अजून आयुष्यची सुरुवात देखील केली नाही, त्यांनाच मरणाच्या तोंडी देऊन ती कुठे गेली असेल? असे एक ना अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. जरी त्यांची उत्तरं मिळाली तरी या चिमुरड्यांचं काय होणार, त्यांचं भविष्य काय असेल हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.