मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.


महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद नावाच्या एका व्यक्तीने कंगना विरोधात मुंबई वांद्रे कोर्टात गेले होते. या व्यक्तीने असा दावा केला होता की, कंगना रनौत आपल्या ट्वीट आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या व्यक्तीचं म्हणणं आहे की, कंगना धार्मिक तेढ निर्माण करत असून हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या व्यक्तीनं केली होती. त्यासाठी त्यांनी कोर्टासमोर तिचे व्हिडीओ, ट्वीट्स सादर केले होते. यासर्व गोष्टींची शहानिशा करून कोर्टानं मुंबई पोलिसांना कंगनावर एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.


यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी एबीपी माझाने बातचित केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, याप्रकरणी कोर्टानेच आदेश दिले असल्यामुळे मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करून घ्यावा लागले.' म्हणजेच, कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलीस पुढिल कारवाईला सुरुवात करणार आहे.


कंगनावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगना रनौतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने कलम 156 (3) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर कंगनाची चौकशी होणार आणि जर कंगना विरोधात पुरावे मिळाले तर मात्र कंगनाला अटकही केली जाण्याची शक्यता आहे.