मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय (मिमोह चक्रवर्ती) विरोधात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिथुन आणि योगिता बाली यांचा पुत्र महाअक्षयविरोधात याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ओशिवरा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 15 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात महाअक्षय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही मॉडल आहे. महाअक्षय आणि ती एकमेकांना अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. महाअक्षय आणि पीडिता 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. महाअक्षयने या काळात पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत शारीरिक संबंध स्थापित केले.


अधिकाऱ्यानं सांगितलं की, साल 2015 मध्ये महाअक्षयने पीडितेला घरी बोलावलं आणि तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध घातलं आणि यावेळी महाअक्षयनं तिच्यासोबत जबरदस्ती केली. त्यानंतरही अनेकदा त्यानं पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला.


आधी दिल्लीच्या बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये योगिता बाली आणि महाक्षयवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पीडितेने या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यासाठी धाव घेतली होती, पण मुंबईत एफआयआर होऊ शकली नाही. त्या दरम्यान पीडिता दिल्लीला शिफ्ट झाली. जिथे तिने दिल्लीतील रोहिणी कोर्टात एफआयआर दाखल करण्यासाठी अपील केली, कोर्टाने प्राथमिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.


तर आरोपीने दिल्ली हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि दाखला दिला की हे कोर्टाचे अधिकारक्षेत्रात नाही. प्रकरण काही दिवसात कोर्टात चाललं याच्यानंतर कोर्टाने आदेश दिले की ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे एफआयआर नोंदविण्यात यावी. याच्यानंतर गुरुवारी मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणावर मिथुन चक्रवर्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांनीची बाजू अद्याप कळू शकलेली नाही.


या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी आरोपीचा जवाब नोंदवलेला नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की, आम्ही लवकरच आरोपीला पोलिस स्टेशनला बोलवणार आहोत आणि त्याचा जवाब नोंदवणार आहोत. येणाऱ्या दिवसात चक्रवर्ती कुटुंबीयांच्या अडचणीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.