मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी सकाळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर धडकले. सुमारे दीड-दोन तास तोडकाम केल्यानंतर महापालिकेने कारवाई थांबवली. या तोडकामाविरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडक काम तूर्तास थांबवलं आहे. मग तोडकाम करण्यासाठी कार्यालयात गेलेले महापालिकेचे कर्मचारी साहित्य घेऊन बाहेर आले असून जेसीबीही रवाना झाला आहे.
कार्यालयातील तळमजल्यावर तोडकाम केलं. तसंच कार्यालयाची संरक्षक भिंत तसंच कंपाऊंडवर जेसीबी चालवण्यात आला. यानंतर कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी तिथे पोहोचले. त्यानंतर ही कारवाई काही काळ थांबवण्यात आली.
कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही
माझ्या घरात कोणतंही अवैध बांधकाम नाही. तसंच कोरोना काळात 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडकामावर सरकारने बंदी घातली आहे. फॅसिझम असंच काहीसं असंच असतं, असं ट्वीट कंगना रनौतने केलं आहे.
सकाळी तोडकामाला सुरुवात
मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाईसाठी कार्यालयात गेले आणि तोडकाम सुरु केलं. यावेळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कंगनाच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई : राम कदम
कंगनाच्या कार्यालयावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. नोटीस दिल्यानंतर बाजू मांडण्याची मुभा द्यायला हवी.
कंगनाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या मुळावर सरकार उठलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राम कदम यांनी दिली. तसंच कंगनाच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यांना भाजपचं समर्थन नाही, असंही त्यांनी सांगितलं.
100 अनधिकृत बांधकामांची यादी देतो, 24 तासात तोडणार का? प्रवीण दरेकर
मुंबई महापालिकेने अहंकारापोटी सूडबुद्धीने कंगना रनौतच्या कार्यालयावर कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. "महापालिकेकडे आतापर्यंत आलेल्या तक्रारींवर महापालिका कारवाई करणार का? मी मुंबईच्या महापौरांना संध्याकाळपर्यंत मुंबईतील 100 अनधिकृत बांधकामांची यादी देतो, ती २४ तासात तोडणार का असा प्रश्न मी विचारतो," असं दरेकर म्हणाले.
संबंधित बातम्या
आधी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना, आता पाकिस्तान असा उल्लेख; कंगनाकडून ट्वीटची मालिका सुरुच
महापालिकेने पाडकाम केल्यावर कंगनाचा ट्विटरवर थयथयाट; पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी
कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात
Kangana Ranaut vs Shiv Sena| कंगनाच्या कार्यालयावर सुरु असलेल्या पालिकेच्या कारवाई तूर्तास थांबवली