मुंबई: मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून त्यासाठी कामाचा कार्यादेश पुढील पंधरा दिवसात जारी केले जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते. 


मुंबईतील रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेचा एकूण सहा हजार कोटीच्या पाच निविदा एकत्रित निमंत्रित करण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या कामाचे कार्यादेश पुढील पंधरा दिवसात जारी केले जाणार आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मुंबईतील छोट्या-मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सला पुढील होणाऱ्या रस्त्याच्या कामातून वगळले गेले आहे. 


सहा हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांमध्ये बाराशे कोटी रुपयांचे पाच पॅकेज असणार आहेत. एका कंपनीला रस्त्याच्या कामासाठी 1200 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल. याआधी एकाच मोठ्या रस्त्याच्या कामासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करत असल्याने त्यामुळे रस्त्याचा दर्जा राखला जात नव्हता. त्यामुळे या निविदा प्रक्रियेमध्ये संयुक्त भागीदारी उपक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. आता मात्र राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना बाराशे कोटी रुपयांची टेंडर दिले जाणार आहे. या कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरीचा वापर करून मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करतील. 


पुढील किमान 10 वर्ष ही रस्त्याची कामं टिकतील आणि रस्त्याचा दर्जा राखला जाईल याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात कार्यादेश देऊन रस्त्यांची काम लवकरात लवकर सुरू केली जातील अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. 


वेगवेगळ्या रस्ते कामांच्या निविदा एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित आणि मोठ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच निविदा निमंत्रित करण्यात आल्या आहेत. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित सहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. `मेकॅनाईज्ड स्लीप फॉर्म पेवर` (Mechanised Slip Form Paver) या अत्याधुनिक संयंत्राचा वापर करून कमीत कमी कालावधीत सर्वोत्कृष्ट दर्जाची रस्ते बांधणी करण्याची अट या निविदांमध्ये समाविष्ट केली आहे. 


सिमेंट क्रॉंकिटच्या रस्त्यांसाठी होणारा खर्च-


शहर विभाग - 1233 कोटी 11 लाख 19 हजार 021
पूर्व उपनगर - 846 कोटी 17 लाख 61 हजार 299


पश्चिम उपनगर


झोन : 3 - 1233 कोटी 84 लाख 83 हजार 230
झोन : 4 - 1631 कोटी 19 लाख 18 हजार 564
झोन : 7 - 1145 कोटी 18 लाख 92 हजार 388


एवढ्या किलोमीटर रस्त्यांची होणार कामे


पश्चिम उपनगर - 253.65 किमी
पूर्व उपनगर - 70 किमी
शहर विभाग - 72 किमी