मुंबई : मुंबईचे रस्ते कधी 'खड्डेमुक्त' व्हायचे ते होतील. मात्र यंदाच्या मॉन्सूनमध्ये खड्डे बुजवण्यासोबत त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज राहिल, अशी ग्वाही मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे. पालिकेनं मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.


जास्त खड्डे असलेल्या भागात इलेक्ट्रॉनिक बोर्ड, साईन बोर्ड, फिरते सूचना फलक लावण्यात येतील. अपघातप्रवण क्षेत्रात मोबाईल रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येतील. या रूग्णवाहिकांसाठी 1800221293 हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. जेणेकरून खड्ड्यांमुळे एखाद्याचा अपघात झाल्यास त्याला तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवता येईल.

वर्षभर मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्त्या सुरू असतात मात्र तरीही मॉन्सून आला की या रस्त्यांची चाळण झालेली असते. त्यामुळे यंदाच्या मॉन्सून दरम्यान हे खड्डे शोधून काढण्यासाठी 'गुगल मॅपिंग' आणि 'सॅटलाईट इमेजिंग'ची मदत घेण्यात येणार आहे. तसेच पालिकेचे स्थानिक नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारीही यासंदर्भात थेट तक्रार करू शकतात असं पालिकेच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

या तक्रारी पालिकेची वेबसाईट, एमसीजीएम 24 बाय 7 या मोबाईल अॅपवरही नोंदवता येऊ शकतात. याशिवाय पालिकेच्या सर्व 24 वॉर्डात अतिरिक्त इंजिनिअर्स तैनात करून त्यांच्याकडे खास खड्ड्यांच्या तक्रार निवारणासाठी व्हॉट्सअॅप नंबर देण्यात येणार आहेत. या तक्रारींचं 48 तासांच्या आत निवारण करण्यात येईल असं सांगत हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार पालिकेनं आगामी मॉन्सूनसाठी सर्व त्या उपाययोजना सज्ज ठेवणार असल्याचं पालिकेनं आपल्या प्रतिज्ञपत्रात म्हटलं आहे.

मॉन्सूनसह इतर वेळेतही खड्डे बुजवण्यासाठी आता पालिकेनं स्वत:च 'कोल्ड मिक्स' तयार करण्याचं ठरवलं आहे. वरळी येथील प्लांटमध्ये यासाठीची यंत्रणा सध्या कार्यान्वित झाली असून जून अखेरीसपर्यंत 3 हजार मेट्रीक टन कोल्ड मिक्स तयार करण्याची पालिकेची योजना आहे. मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून मुंबईत सध्या 1113 मार्ग आणि 121 जंक्शनवर रस्ते दुरूस्तीची कामं सुरू आहेत. ज्यातील 664 मार्ग आणि 106 जंक्शनची कामं पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.