मुंबई : कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये 16 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन सुरू आहे. हवेतून ऑक्सिजन बनवणाऱ्या  प्लांटमधून दररोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. या संबंधी निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्याभरात हा प्लांट सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. 


अशा प्रकारचे प्लांट मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात आणि जोगेश्वरीच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सुरू आहेत. आता एकूण 12 रुग्णालयात 16 नवीन प्लांट सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या 16 प्रकल्पांसाठी जवळपास 90 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकल्पांचे आयुर्मान किमान 15 वर्षे असणार आहे. 


राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचं दिसून येतंय. मुंबईतही ऑक्सिजनची मागणी ही प्रत्येक रुग्णालयातून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हवेतून प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता आहे. 


महापालिकेचे हे प्लांट सुरू झाल्यास दररोज 43 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती सुरू होणार आहे. तसेच यामुळे सध्या ऑक्सिजन खरेदीवर जो खर्च होत आहे तो निम्म्यावर येणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी हा प्रकल्प फायदेशीर आहे. मात्र या प्रकल्पाची अत्यावश्यकता लक्षात घेता वेळ न वाया घालवता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याभरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष महापालिकेसमोर आहे. त्यामुळे तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 


राज्यात कोरोनाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळं राज्यभरात होत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा सध्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून राज्यात ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत. 


महत्वाच्या बातम्या :