मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांअंतर्गत काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये विविध सेवांच्या वाहनांचा समावेश ठराविक प्रवर्गांमध्ये करत त्यांच्यावर लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचे स्टीकर लावण्याचा नियम मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आला होता. पण, आता मात्र ही अट मागे घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


यापुढं वाहनांवर रंगीत स्टीकर लावण्याची अट बंधनकारक नसली तरीही वाहनांची तपासणी मात्र सुरुच राहणार आहे. लॉकडाऊनचे नियम लागू होता वाहनांच्या ये-जा करण्यावर आलेल्या निर्बंधांअंर्गत काही वाहनांना यातून वगळत त्यांना स्टीकर लावण्याचे निर्देश दिले होते. 


Coronavirus Mumbai | दिलासा! मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ


पोलिसांनी लागू केलेल्या या अटीअंतर्गत डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी, रुग्णवाहिका, वैद्यकिय मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लाल रंगाच्या स्टीकरची अट होती. तर, खाद्यपदार्थ, भाज्या, फळं, किराणा सामान, दुग्धजन्य पदार्थांची उत्पादनं यांसाठीच्या वाहनांवर हिरव्या रंगाचे स्टिकर बंधनकारक होते. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवांमध्ये येणारे कर्मचारी ज्यांमध्ये नगरपालिका अधिकारी, वीज पुरवठा विभागातील कर्मचारी, बँक कर्मचारी, वकील, माध्यम प्रतिनिधी आणि दुरसंचार विभागात काम करणाऱ्यांनी आपल्या वाहनांवर पिवळ्या रंगाचा स्टिकर लावणं अपेक्षित होतं. 






स्टिकरमुळं नागरिकांमध्ये संभ्रम 


मुंबई पोलीस स्टिकरच्या या नियमासाठी आग्रही दिसत होते. काही ठिकाणी खुद्द पोलिसांनीच हे स्टिकर वितरितही केले होते. पण, याच मुद्द्यावरुन नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम दिसून आला. नागरिकांमधील हाच संभ्रम पाहता अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला. 


मुंबईतील कोरोना परिस्थिती नेमकी काय सांगते? 


सध्याच्या घडीला महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा सुधारत असताना मुंबईतही सलग अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी शहरात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून सावरलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक होतं. त्यामुळं नागरिकांकडून नियमांचं काटेकोरपणे पालन झाल्यास हे प्रमाण 84 टक्क्यांच्याही पलीकडे जाऊन मुंबईतील कोरोनाबाधित झपाट्यानं बरेही होतील आणि हा संसर्ग नियंत्रणात येण्यास मदतही होईल.