Maharashtra Coronavirus कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत असल्यामुळे आता रुग्णांना वैद्यकिय सेवांचाच तुटवडा जाणवू लागला आहे. कुठे बेड नाही, कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठाही अपूरा पडू लागला आहे. मन खिन्न करणारी ही परिस्थिती पाहता आता अनेकजण स्वखुशीनं कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये कलाकार मंडळीही मागे नाहीत. सध्या मराठी रंगभूमी आणि चित्रपट जगतात नावलौकिक मिळवलेला अभिनेता भरत जाधव यांनीही काही गरजवंतांची मदत करण्यासाठी एक अनोखी संकल्पना सर्वांना सुचवत कळकळीची विनंती केली आहे. 


सोशल मीडियावरील एक पोस्ट नजरेखालून गेली आणि ती आपल्याला पटली, त्यामुळंच चाहत्यांपर्यंतही भरत जाधव यांनीह ही पोस्ट पोहोचवली. 'एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे; माझ्या सोसायटी मधे 4 जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट 1bhk, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटी मधील 2 रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा - औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा 6 महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. 15 दिवसांनी सर्वजण बरे झाले. आता तेच फ्लॅट इमरजेंसीसाठी राखूं ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न', अशी ही पोस्ट. 


Mumbai Lockdown | मुंबईत वाहनांवरील रंगीत स्टीकर्सचा नियम रद्द, तपासणी मात्र सुरुच राहणार 


अतिशय मोजक्या शब्दांत या पोस्टमधून अडीअडचणीच्या वेळी आपण नेमकं काय करु शकतो आणि समयसूचकता ठेवून कठिण प्रसंगही कसा थोपवून धरु शकतो हेच शिकवून जात आहे. हीच बाब अधोरेखित करत आपण सर्वांनीही संकटकाळात पुढे येत रिकामे घर, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे रुग्णसेवा किंवा इतर समाजोपयोगी कामांसाठी वापरात आणण्याची परवानगी देत आपलं कर्तव्य बजावावं अशी विनंती भरत जाधव यांनी केली. 






भरत जाधव यांनी केलेली ही पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून गेली, सोबतच सर्वांनाच एक मार्गही दाखवून गेली. आता या मार्गाचा अवलंब किती ठिकाणी केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.