BMC News : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी, तसेच त्यातून अद्ययावत माहिती आणि सांख्यिकी संकलन व विश्लेषण करता यावे, पर्यायाने रस्ते विभागाच्या कामांची अंमलबजावणी, धोरण आखणी, नियोजनातील उपयुक्तता वाढावी म्हणून रस्ते व वाहतूक विभागाकडून माहिती विश्लेषण सेवा घेण्यात येणार आहे. परिणामी रस्ते विभागाच्या सर्व कामांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून त्याचा महानगरपालिका प्रशासनाला मोठा फायदा होईल.
महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडे संपूर्ण मुंबईत रस्ते कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. या प्रकल्पांमध्ये मोठ्या आणि छोट्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (सीसी), पदपथांचे सुशोभीकरण आणि ठाशीव काँक्रिटीकरण, रस्ते बांधणी कामांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यासोबतच रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि रस्त्यांचे पृष्ठीकरणाच्या देखील करण्यात येते. या सर्वच कामांमध्ये कामे सुरु होण्यापूर्वी, कामे सुरु असताना व दायित्व कालावधीत देखील यंत्रणेला मोठ्या प्रमाणात माहिती (डेटा) संकलन करण्याची गरज भासते. तसेच ही माहिती व सांख्यिकी सातत्याने अद्ययावत करुन, विश्लेषण करुन त्याआधारे कामांच्या अंमलबजावणीवर देखरेखही करावी लागते.
या कार्यवाहीमध्ये सूसूत्रता व वेग आणण्याच्या दृष्टीने, रस्ते विषयक प्रकल्पांची माहिती संकलन आणि विश्लेषण, अहवाल आदी करण्यासाठी रस्ते विभागामार्फत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माहिती विश्लेषणातून रस्ते व वाहतूक विभागाची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेसाठी डॅशबोर्ड, सादरीकरण, अहवाल इत्यादी तयार करणे या बाबी देखील यामधून साध्य करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू यांनी सांगितले.
सल्लागाराच्या जबाबदाऱ्या-
- रस्ते आणि वाहतूक विभागाच्या महत्वाच्या प्रकल्पांचे संनिरीक्षण करणे.
- प्रकल्पांशी संबंधित विविध घटकांसोबत समन्वय ठेवून नियमित माहिती मिळवणे, प्रकल्पातील अडथळे, अडचणी विभागाच्या लक्षात आणून देणे
- प्रत्येक प्रकल्पामधील अडथळे आणि आव्हाने अभ्यासून संबंधित यंत्रणेला उपाययोजनांसाठी सल्ला देणे
- प्रशासकीय प्रमुखांना आढावा घेता येईल अशारितीने प्रकल्पाची एकत्रित व अद्ययावत माहिती तयार ठेवणे
- प्रकल्पांमधील कामगिरी, महत्त्वाचे मुद्दे यांच्यासह सादरीकरण व अहवाल तयार करणे
- प्रकल्पाच्या नियोजनाचा आराखडा तपासणे आणि वेळेत पूर्ततेसाठी काटेकोरपणे देखरेख ठेवणे
- प्रशासनाला अद्ययावत तंत्रज्ञानाची सातत्याने माहिती पुरवणे, जेणेकरुन प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ व वेग साध्य करता येईल.
मुंबईतील नागरिकांसाठी सुलभ दळणवळणाच्या अनुषंगाने रस्ते आणि वाहतूक विभागाने शहर आणि उपनगरात वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची अंमलबजावणी रस्ते विभागाकडून सुरू झाली आहे. रस्त्यांची निरनिराळी कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत चांगल्या गुणवत्तेचे रस्ते उपलब्ध असावेत, यासाठी उपायुक्त (पायभूत सुविधा) श्री. उल्हास महाले हेदेखील नियमितपणे सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा करत असतात. माहिती विश्लेषणाच्या या अत्याधुनिक सेवेमुळे प्रशासनाला अत्यंत परिणामकारकपणे व जलदगतीने या कामांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मदतच मिळणार आहे.
महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पांशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सल्लागाराकडे सोपवली जाणार आहे. सल्लागाराच्या चमूमध्ये तांत्रिक मनुष्यबळाचा देखील समावेश राहणार आहे. आगामी एक वर्ष कालावधीसाठी सल्लागार नेमण्याच्या या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
प्रकल्पांच्या माहितीसाठी डॅशबोर्ड-
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते विभागाशी संबंधित प्रकल्पांबाबतची माहिती एकत्रित संकलित करणे तसेच ही माहिती एकत्रपणे उपलब्ध होणे, हे डॅशबोर्ड निर्मितीचे उदिष्ट आहे. मुंबईतील रस्त्यांच्या प्रकल्पांची माहिती तसेच रस्त्यांचे खड्डे दुरूस्ती आणि पृष्ठीकरणाची कामे याबाबतची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून वेळोवेळी यंत्रणेला उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाबाबतची माहिती तसेच अद्ययावत तंत्रज्ञान यंत्रणेला वेळोवेळी अवगत करून देणे देखील अपेक्षित आहे. सध्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून मुंबईतील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामाचा डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांना देखील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची अद्ययावत माहिती ऑनलाईन पाहता येते. हा अनुभव लक्षात घेता आता रस्ते प्रकल्पांशी संबंधित माहिती विश्लेषण निश्चितच प्रशासनाला सहायकारी ठरेल.