मुंबई : खिचडी घोटाळा झाला आहे, त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नाव आली आहेत. आमची नाव आली तर आम्ही दोघेही राजकारनाचा त्याग करायला तयार आहे. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर का मांडीत घेऊन बसतात का?, असा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी केला.  आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देणार का ? असा सवाल यावेळी राहुल कनाल यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) विचारला. शिवसेना युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल (rahul kanal) आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी पुरावेही दाखवले. सुरु तुम्ही केलं, संपवणार मी, असेही यावेळी ते म्हणाले. अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर मग राजकारणातून राजीनामा द्या, असे राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना चॅलेंज केले.


संजय राऊत ह्यांनी आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, असे राहुल कनाल यांनी सांगितलं.  फॅक्ट नसताना बोलणं योग्य नाही, कोणत्या प्रकारे आणि कोणत्या थराला जाऊन संजय राऊत साहेब बोलतायत ते आमचे आदरणीय नेते होते आणि आहेत. काल त्यांनी जे वाक्य वापरलं, ज्या एजन्सीच्या चौकशी लागली आहे, सत्तेत असणाऱ्यांना चौकशी लागत नाही, असं म्हटले तर मी सांगतो काही कारकुनांची 2022 सालापासून चौकशी सुरु होती. माझ्यावर त्या काळात कोणतीही केस माज्यावर नाही केवळ प्रेमापोटी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो आहे, असे कनाल यांनी सांगितलं. 


महापौर बंगल्यावर बसून डील व्हायच्या - 


महापौर बंगल्याचे cctv बघा मग सर्वांना समजेल. सुनील बाळा कदम हा राऊत साहेबांचे दौरे बघायचा, तेव्हा महापौर बंगल्यावर बसून डील व्हायचे. तेव्हा राऊत कुणाला फोन करायचे? वरळीच्या हिल टॉप हॉटेलमध्ये कुठला कारकून काम करत होता? त्याचे cctv पब्लिकमध्ये आणा, तो कारकून कोणाला भेटलेला हे त्यातून समजेल. पक्षाची वाताहत झालेली आहे हेचं कारण आहे, असा हल्लाबोल कनाल यांनी केला. 


संजय राऊत काय म्हणाले होते ?


काल किशोरीताई पेडणेकर संदीप राऊत यांचे चौकशी झाली पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत ते भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत. खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा, त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत? ते जाहीर करा, लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊ द्या सर्वांचं वस्त्रहरण करतो, असे संजय राऊत म्हणाले.