मुंबई : येत्या 10-15 दिवसात पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होण्याची (School Reopen)  शक्यता आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळांबाबत निर्णय होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या बैठकीत सर्व शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यात कोरोना रुग्णांचा (Coronavirus)  आलेख घसरु लागल्यानं शाळा सुरु करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढतोय. 


सध्या मुख्यमंत्री मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढे काही दिवसात शाळांबाबत (School) चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं कळत आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरु झालेत. पण पहिलीपासूनचेही वर्ग सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, शाळाचालक, पालकही आग्रही दिसत आहेत.


60 टक्के विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडिज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरु कराव्यात असा सल्ला काही डॉक्टरांनी दिला आहे. महिन्याच्या सुरुवातील राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांची तितकीशी उपस्थिती दिसत नाही. देशभरात अनेक ठिकाणी अद्याप शाळा उघडलेल्या नाहीत. उशीर न करता देशभरातील सर्व शाळा सुरु कराव्यात, असं डॉक्टरांनी म्हटलेय. शाळा बंद असल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी उशीर व्हायला नको, असं त्यांनी म्हटलं आहे. 


वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आधीच नुकसान झालं आहे. शारिरीक आणि मानसिक नुकसान तर होतच आहे. त्याशिवाय सामाजिक जडणघडणही होत नाही. यावर उपाय म्हणजे, लवकरात लवकर शाळा सुरु करायला हव्यात, असं राष्ट्रीय निओनॅटोलॉजी फोरमचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश तोमर यांनी सांगितलं आहे.


पुन्हा सगळं पूर्ववत झालं आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्यात कोणताही धोका नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आपला सामना केला आहे. त्याला आपण चांगल्या पद्धतीने ओळखलेय. काय करायला हवं हे चांगलं माहित आहे. यामध्ये लहान मुलं सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत. यापैकी अनेकजणांना यााधीच कोरोनाची लागण झाली अन् ते ठिकही झाले. काही मुलांमध्ये तर कोरोनाची लक्षणेही आढळली नाहीत. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवायला हवं, असे देखील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. 


संबंधित बातम्या :


60 टक्के मुलांमध्ये नैसर्गिक अँटिबॉडी, शाळा तात्काळ सुरु करा - डॉक्टरांचा सल्ला


Maharashtra School Reopen :राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच निर्णयाची शक्यता


CM Uddhav Thackeray : शाळेत मोकळं ढाकळं वातावरण ठेवा, पण काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचं आवाहन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha