मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) कोरोना काळात खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग (Dead Body Bag) खरेदी प्रकरणी ईडीने (ED) मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने याआधी बुधवारी, 8 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी इतर दिवशी चौकशी करण्याची विनंती केली होती. अखेर ईडीकडून आता 23 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखक केले होते. माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतरांची देखील ECIR मध्ये नावं आहेत. कथित फसवणूकीची रक्कम सुमारे 49.63 लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ईडी चौकशीसाठी काहींना समन्स बजावू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकर आणि ईडीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.
काही दिवसापूर्वी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र त्यांनी दोन आठवड्याची वेळ मागितली होती. त्यानंतर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नवीन समन्स देऊन 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे.
अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची चौकशी
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची ईडीने जवळपास 5 तास चौकशी केली. कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेने बाजार भावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने ही डेड बॉडी बॅग खरेदी करण्यात आले असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांसह आता तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.
वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.