मुंबई : आता मुंबईकरांनी चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली, तर त्यांचा खिसा 10 हजारांनी रिकामा होणार आहे. मुंबईतील वाहनतळांलगत 1 किमीच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केल्यास तब्बल दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केल्यासही हा दंड वसूल केला जाणार आहे.
मुंबईतील वाहनतळांलगत एक किलोमीटरपर्यंतचे रस्ते, दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी दिले आहेत. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माजी सैनिकांना नेमण्याचे निर्देशही कंत्राटदारांना आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबई महापालिकेद्वारे 146 ठिकाणी तब्बल 34 हजार 808 वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केलं जातं. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, याकरिता वाहनतळांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्ता, तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत.
याबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती होण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचेही निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 7 जुलै 2019 पासून करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहन 'पार्क' केल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसंच हा दंड न भरल्यास संबंधित वाहन 'टोइंग व्हॅन'द्वारे उचलून नेलं जाणार आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कंत्राटदार नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात संबंधित कंत्राटदाराला माजी सैनिकांची नेमणूक करणं बंधनकारक असेल. तसंच यासाठी आवश्यक त्या प्रमाणात 'टोइंग मशीन' भाड्याने घेऊन वाहतूक पोलिसांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.