मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. आज विधानसभेचं कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदार एकनाथ खडसे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना दिसले.


आधी सौरपंपांच्या विषयावरुन नंतर आता आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर एकनाथ खडसेंनी मंत्र्यांना झापले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळातच गेल्याचा आरोप खडसेंनी केला. तसंच नवीन आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरांवर संताप व्यक्त करत एकनाथ खडसेंनी सरकारला धारेवर धरलं.

पक्ष वाढवण्यासाठी भाजपला आयात नेत्यांची गरज, एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 जून) पार आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 10, शिवसेनेचे 2 तर रिपाइंच्या एका नेत्याला मंत्रीपदाची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात आयात नेत्यांना प्राधान्य देण्यात आलं. मंत्रिपदापासून लांब ठेवल्यामुळे एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

एकनाथ खडसे गेल्या तीन वर्षांपासून मंत्रिपदापासून दूर आहेत. भ्रष्टाचार, जमीन घोटाळेसह विविध आरोपांमध्ये अडकलेल्या एकनाथ खडसे यांनी 4 जून 2016 रोजी राजीनामा दिला होता. खडसेंनी आपल्याकडील महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली होती. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या या अधिवेशनात सत्ताधारी असलेले नाराज एकनाथ खडसे सरकारवरच प्रश्नांचा सरबत्ती करत होते.