मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत गेल्या 4 दिवसांपासून पावासाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या परतीच्या पावसामुळे धरणक्षेत्र भागातील नद्यांमधून पावसाचे पाणी जलशयात जात आहे. येथील भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांमध्‍ये सातत्‍याने पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे दिनांक 21 ऑक्‍टोबर 2024 पासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई (Mumbai) महानगरातील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गढूळता कमी करण्यासाठी महानगरपालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. तथापि, खबरदारीचा उपाय म्‍हणून नागरिकांनी पाणी (Water) गाळून व उकळून प्‍यावे, अशी विनंती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्त्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्त्रोतापैकी भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात गत 3 ते 4 दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची गढूळता दिनांक 21 ऑक्‍टोबर 2024 पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत. पाण्‍यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्‍या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे. या बाबी लक्षात घेता, नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्‍त झाल्‍यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.


दरम्यान, गढूळ पाणी प्यायल्याने साथीच्या रोगाचे आजार पसरु शकतात, त्यामुळे, थंडी-ताप किंवा सर्दीच्या आजारांना निमंत्रण दिले जाऊ शकते. म्हणून, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून प्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. 


हेही वाचा


नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला