मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना संकटामुळे अनेक गणेशोत्सव मंडळे मोठी गणेशमूर्ती, मिरवणुका या गोष्टी टाळणार असले तरी देखील गणेशमंडळांनी मुंबईतील जुन्या आणि धोकादायक पुलांवरुन मूर्ती घेऊन जाऊ नये तसेच मिरवणुका काढू नयेत असं आवाहन केलं आहे. मुंबईतील अनेक पूल वाहतुकीस धोकादायक असल्यामुळे गणेशभक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करू नये, लाऊड स्पीकर बंद ठेवावा आणि पुलावर थांबू नये असे निर्देश मुबंई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. याबाबत महापालिकेने 13 धोकादायक पुलांची यादीही जाहीर केली आहे.


धोकादायक पुलांची यादी


मध्य रेल्वे : घाटकोपर उड्डाणपूल, करीरोड उड्डाणपूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा उड्डाणपूल.


पश्चिम रेल्वे: मरिन लाईन्स उड्डाणपूल, सॅण्डहर्स्ट उड्डाणपूल, चर्नीरोड–ग्रॅन्टरोड दरम्यानचा फ्रेंच उड्डाणपूल, केनेड उड्डाणपूल, ग्रॅन्टरोड–मुंबई सेंट्रल दरम्यानचा फॉकलँड उड्डाणपूल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील बेलासीस उड्डाणपूल, महालक्ष्मी स्टील उड्डाणपूल, प्रभादेवीचा कॅरोल उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाणपूल.


16 टनांपेक्षा जास्त वजन नको


आगमन-विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढू नये, गर्दी टाळावी असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय करीरोड ओव्हरब्रीज, ऑर्थर रोड ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रिज या पुलांवर भाविक व वाहनांचे मिळून एका वेळेस 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी, पुलांवर लाऊड स्पीकर लावू नये, पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.


गणेश मंडळांना पुलांबाबतच्या संभाव्य धोक्याबाबत आवश्यक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. जाहीर करण्यात आलेले पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक बनले आहेत. यामधील काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत, तर काही पुलांच्या दुरुस्तीचे काम पावसाळय़ानंतर करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालिकेने घालून दिलेले नियम पाळावेत, आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.