मुंबई : बाऊन्सर्स नेमण्यापाठोपाठ मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आता एका नव्या वादात सापडलेत. कोरोना संकटामुळं पालिकेच्या तिजोरीवर ताण आलेला असताना दुसरीकडं आयुक्त आपल्या बंगल्यावर मात्र 40 लाख रूपये खर्च करायला निघालेत. ज्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी बंगल्याची दूरवस्था झाल्याने हा खर्च करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.
मुंबईत कोरोनाचे संकट पूर्णत: संपलेलं नाही. कोरोना संकटामुळं एकीकडं पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना दुसरीकडं आयुक्त मात्र नको त्या गोष्टीवर वारेमाप खर्च करत सुटलेत, असा आरोप विरोधकांनी केलाय.

पालिकेचे सुरक्षा कर्मचारी असतानाही स्वत:च्या कार्यालयाबाहेर खाजगी बाऊन्सर्स नेमण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ते पेडर रोड भागातील आयुक्त बंगल्यावर करण्यात येणा-या 40 लाख रूपयांवरुन आता वाद निर्माण झालाय.

एकीकजे कोविड संकटामध्ये तात्पुरतं कामावर घेतलेल्या कोरोना योद्धांचे मानधन थकीत आहे. अश्या स्थितीत इकडं आयुक्त मात्र स्वत:च्या बंगल्यावर लाखो रूपये खर्च करत असल्यामुळे विरोधक आणि भाजपनं आयुक्तांच्या कारभारावर टिकेची झोड उठवलीय.

बंगले दुरुस्तीच्या वादावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा निशाणा

"स्वतःच्या गाड्या आणि बंगल्यांवर उधळपट्टी करणारे मंत्री अधिकाऱ्यांवर काय लगाम लावणार?" असा सवाल करत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंघ चहल यांच्या बंगले दुरुस्तीच्या वादावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला. कोविड योद्ध्यांना पगार न देता स्वतःच्या बंगल्यावर लाखो रुपये खर्च करण्यावर दरेकर यांनी आक्षेप नोंदवलाय.

शिवसेना महापौरांकडून आयुक्तांची पाठराखण
शिवसेनाकडून महापौरांनी मात्र आयुक्तांची पाठराखण केलीय. आयुक्त बंगल्याची दुरुस्ती होणे का गरजेचे आहे, याबाबचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिलंय. आयुक्त चांगलं काम करतायेत. स्वत: सगळीकडे फिरतायेत. त्यांच्याबाबत नाहक वाद नकोत, अशी प्रतिक्रीया महापौर किशोरी पेडणेकर यांनी नोंदवलीय. 3 वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त अजॉय मेहतांनी या बंगल्यावर 50 लाख रूपये खर्च केलेले आहेत, मग आता लगेच 40 लाखांचा खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केलाय.

आतापर्यंत आयुक्त बंगल्तयावर किती खर्च

  • गेल्या 8 वर्षात आयुक्तांच्या बंगल्यावर तब्बल पावणे दोन कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. 2012 मध्ये सिताराम कुंटे आयुक्त होते तेव्हा 29.29 लाख रुपये खर्च.

  • 2016 मध्ये अजॉय मेहता आयुक्त असताना 50 लाख रुपये खर्च. तसंच मध्यंतरी आणखी काही कामासाठी 97 लाख रूपये खर्च केल्याची माहिती आहे


आयुक्तांचे स्पष्टीकरण काय?

याबाबत आयुक्तांनी आपले स्पपष्टीकरण जारी केलं आहे. आयुक्त बंगल्याची दुरुस्ती आणि संवर्धनाची प्रशासकीय प्रक्रिया सन 2019 मध्येच सुरु करण्यात आली होती. हे लक्षात घेता, स्पष्ट होते की, कोविड 19 संसर्गाच्या काळात महानगरपालिका प्रशासन उधळपट्टी करत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. असे म्हटलं आहे.

खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा, शेतकरी-कामगारांचं हित जोपासणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कसा आहे आयुक्तांचा बंगला?

  • सन 1920 मध्ये बांधण्यात आलेला हा 100 वर्ष पुरातन बंगला, पुरातन वास्तुंच्या यादीत दर्जा 2 ब मध्ये समाविष्ट आहे.

  • एकमजली स्वरुपाच्या या बंगल्याचे संरचनात्मक परीक्षण जून 2019 मध्ये करण्यात आले होते. मेसर्स शशांक मेहंदळे ॲण्ड असोसिएटस् यांनी सदर परीक्षण अहवालामध्ये या बंगल्याची सर्वंकष दुरुस्ती व संवर्धनात्मक कामे करण्याच्या शिफारशी केल्या आहेत.

  • सदर बंगल्याचे बांधकाम 100 वर्ष जुने व छत कौलारु स्वरुपाचे आहे. पावसाळ्यामध्ये या बंगल्यात पाणी गळतीची समस्या भेडसावत असते. पाणी गळतीमुळे भिंतीमध्ये ओलावा, भिंतीना तडे जाणे, बंगल्यातील फर्निचर वारंवार खराब होणे, लाकडी खिडक्या व दरवाजे यांच्यासह भिंतीमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होणे या प्रकारच्या समस्या वरचेवर उद्‌भवत आहेत.

  • सदर बंगल्याचे पुरातन वास्तूमूल्य टिकून राहण्यासाठी तसेच तो राहण्यायोग्य होण्याच्या दृष्टीने विशेष दुरुस्ती करण्यासाठी मुंबई संस्कृती वारसा जतन समितीची परवानगी घेण्यात आली आहे. म्हणजेच महानगरपालिका आयुक्त सेवानिवासस्थान दुरुस्ती व संवर्धनाची प्रशासकीय प्रक्रिया ही सुमारे वर्षभरापूर्वीपासूनच सुरु आहे.

  • दुरुस्ती व संवर्धन कामांची व्याप्ती लक्षात घेता सदर वास्तू राहण्यायोग्य करण्यासाठी विविध कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमानुसार प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन निविदा प्रकाशित करण्यात आली आहे.


एबीपी माझाची टीम बंगल्यावर पोहोचली तेव्हा तिथे काय आढळलं?

मात्र, आयुक्तांच्या बंगल्याची सध्या नेमकी काय अवस्था आहे? बंगल्याची दुरुस्ती करणं गरजेचं झालंय का? या प्रश्नांची खरी उत्तरं शोधण्यासाठी एबीपी माझाची टिम थेट आयुक्त बंगल्यावर पोहोचली. तेव्हा मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात गळकं छत, जमिनीवर ठिकठिकाणी गळणा-या पाण्यासाठी बादल्या, तर, शयनगृहाचीही दूरवस्था झाल्याचं आढळलं.

Mumbai Covid Centers | मुंबईतील लहान कोविड सेंटर बंद होणार, रुग्णसंख्या घटत असल्याने पालिकेचा निर्णय