मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत बृहन्मुंबई महापालिकेच्या 7 परिमंडळांमधील ज्या विभागात स्वच्छता विषयक कामकाज सर्वात प्रभावी आढळून येईल, त्या विभागाच्या नगरसेवकांना त्यांच्या विभागातील विकासकामे करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा विशेष निधी पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त वैशिष्ट्यपूर्ण कामे करणाऱ्या 5 नगरसेवकांना 10 लाख ते 50 लाख रुपये इतकी रक्कम त्यांच्या विभागातील विकासकामांसाठी पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे.

विभागस्तरीय कार्यवाहीत वैशिष्ट्यपूर्ण सहभाग नोंदविणाऱ्या 6 स्वयंसेवी संस्थांना 5 लाख ते रुपये 50 लाखांची रक्कम त्याच विभागातील विकासकामांसाठी पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे. तर याच अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण कार्यवाही करणाऱ्या शाळा, मंडई, रहिवासी कल्याणकारी संस्था इत्यादींचाही विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.

वरील तपशिलानुसार देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी निवड करण्यासाठी प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीद्वारे 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' च्या निकषांच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा ही येत्या 31 डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी नुकतीच संमती दिलेल्या प्रशासकीय प्रस्तावातील ठळक मुद्दे

नगरसेविका / नगरसेवक यांना पुरस्कार
बृहन्मुंबई महापालिकेच्या सात परिमंडळांमध्ये असणाऱ्या विभागांपैकी (Electroal Ward) ज्या विभागात स्वच्छता विषयक कार्यवाही सर्वाधिक प्रभावी आढळून येईल, त्या विभागाच्या नगरसेविका / नगरसेवक त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन बाबींसाठी रुपये 1 कोटींचा पुरस्कार देण्यात येईल. याच अनुषंगाने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार (1st Runner up) 50 लाखांचा, तर तिसऱ्या (2nd Runner up) क्रमांकाचा पुरस्कार 25 लाखांचा असणार आहे. या व्यतिरिक्त 3 नगरसेविका / नगरसेवक यांना प्रत्येकी रुपये 10 लाखांचे तीन पुरस्कार प्रोत्साहन स्वरुपात देण्यात येणार आहेत.

स्वच्छता विषयक कार्यवाही प्रभावीपणे व वैशिष्ट्यपूर्णपणे करणाऱ्या सात परिमंडळातील प्रत्येकी 6 यानुसार एकूण 42 नगरसेविका / नगरसेवक यांना रुपये 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

वरील तपशिलानुसार पुरस्कारांची रक्कम ही पुरस्कारांची घोषणा झाल्याच्या पुढील वर्षात विकास निधी विषयक तरतुदींनुसार आणि संबंधित नियम व पद्धतींनुसार नगरसेविका / नगरसेवक यांनी त्यांच्याच विभागातील घनकचरा व्यवस्थापन विषयक बाबींसाठी वापरावयाची आहे.

स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार
स्वच्छता विषयक कार्यवाही सर्वाधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेला काही स्वयंसेवी संस्था मदत करत असतात. या अनुषंगाने प्रत्येक परिमंडळामध्ये असणाऱ्या विभागांच्या स्तरावर (Electroal Ward) ज्या स्वयंसेवी संस्थेचे कार्य सर्वात प्रभावी असेल, त्या स्वयंसेवी संस्थांना देखील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

स्वच्छता विषयक कार्याच्या अनुषंगाने सात परिमंडळांमध्ये असणाऱ्या विभागांच्या स्तरावर काम करणा-या स्वयंसेवी संस्थांपैकी ज्या संस्थेचे कार्य सर्वात प्रभावी असेल त्या संस्थेला रुपये 50 लाखांचा पुरस्कार. याच अंतर्गत रुपये 25 लाखांचा दुसरा पुरस्कार, तर रुपये 10 लाखांचा तिसरा पुरस्कार देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रुपये 5 लाखांचे तीन प्रोत्साहन पुरस्कारदेखील देण्यात येणार आहेत.

स्वच्छता विषयक कार्यवाही प्रभावीपणे व वैशिष्ट्यपूर्णपणे करणाऱ्या सात परिमंडळातील प्रत्येकी 6 स्वयंसेवी संस्थांना; अर्थात एकूण 42 स्वयंसेवी संस्थांना रुपये 5 लाख ते 50 लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तथापि, ही रक्कम संबंधित स्वयंसेवी संस्थेला थेटपणे दिली जाणार नाही, तर त्यांनी घन कचरा व्यवस्थापन खात्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुढील आर्थिक वर्षात महापालिकेद्वारे उपयोगात आणली जाणार आहे.

या तपशिलानुसार पुरस्कारांची रक्कम ही पुरस्कारांची घोषणा झाल्याच्या पुढील वर्षात विकास निधी विषयक तरतुदींनुसार आणि संबंधित नियम व पद्धतींनुसार वापरता येणार आहे. यानुसार ज्या विभागातील कामासाठी पुरस्कार मिळाला असेल, त्याच विभागातील घन कचरा व्यवस्थापन विषयक बाबींसाठी पुरस्कार रक्कम वापरता येणार आहे.

शाळा, मंडई इत्यादींना पुरस्कार
महापालिकेच्या सात परिमंडळांच्या स्तरावर आपल्या विभागात संपूर्ण स्वच्छता विषयक कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा, मंडई, रहिवाशी कल्याणकारी संस्था (Resident Welfare Association / RWA), सुपरिचित व्यक्तिमत्व (Eminent Personality) इत्यादींनाही पुरस्कारांने गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्कारांची रक्कम देखील ज्या विभागांसाठी पुरस्कार देण्यात आला आहे, त्याच विभागातील घन कचरा व्यवस्थापन विषयक बाबींसाठीसंबंधित नियम व पद्धतींनुसार पुढील वर्षात उपयोगात आणता येणार आहे.