मुंबई : पाऊस आणि सुट्टीचा दिवस म्हंटला की, समुद्रावर जाण्याचा मोह काही आवरत नाही. मात्र मुंबईच्या समुद्रावर फेरफटका मारणाऱ्यांना जेलीफिशपासून सावधान रहावं लागणार आहे. कारण शनिवारी गिरगाव चौपाटीवर ब्लू-बॉटल जेलीफिश ही विषारी माशांची प्रजात आढळून आली आहे.


शनिवारी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर ब्लू-बॉटल जेलीफिश ही विषारी प्रजात आढळून आली. त्यानंतर समुद्र किनारी फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

वास्तविक, ब्लू-बॉटल जेलीफिशला 'पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर' म्हणूनही ओळखलं जातं. हा मासा समुहाने समुद्रात वावरतो. गेल्या काही वर्षात जेलीफिशचं समुद्र किनारी येण्याचं प्रमाण वाढत आहे. यामागे समुद्रातील तापमान बदल आणि समुद्र किनाऱ्याकडील भागात त्यांचं खाद्य उपलब्ध असल्याचं मुख्य कारण सांगितलं जात आहे.

या ब्लू-बॉटल जेलीफिशच्या शुंडकांवर निमॅटो फोर्स नावाच्या पेशी असतात. त्यामध्ये विष भरलेलं असतं. या फिशचा एखाद्या माणसाला स्पर्श होतो, तेव्हा त्याच्या पेशीतल्या विषाचा त्याला दंश होतो.

यावेळी दंश झालेली जागा जागा लाल होते, तसेच खाज सुटते. हे विष अतिशय घातक असल्याने त्याचा शरिरावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे हे मासे दिसायला जरी अतिशय सुंदर असले, तरी पर्यटकांनी त्यापासून दूर राहणंच चांगलं आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.