मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईतल्या छोट्या छोट्या व्होट बँकांकडे मोर्चा वळवण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तामिळ आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.


मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्यास भाजपचा सामना मुख्यत्वे शिवसेनेशी असेल. शिवसेनेचा मुख्य मतदार पारंपरिक मराठी समुदाय असेल. शहरात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भाजपला कंबर कसून काम करावं लागेल.

भाजपने तामिळ आणि मुस्लिम समाजाकडे मोर्चा वळवल्याचं चित्र आहे. मुंबईतील एकूण मतदारांपैकी 4 टक्के तामिळ असल्याची माहिती आहे. म्हणजेच 38 लाख मतदारांपैकी एक ते दीड लाख मतदार हे तामिळ असतील. तामिळ मतदार मुख्यत्वे काँग्रेसच्या बाजुने राहिलेला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील मतदार निकालावर मोठा प्रभाव पाडू शकतात.

भाजपचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन महाराष्ट्र विधानसभेत एकमेव तामिळ सदस्य आहेत. त्यामुळे येत्या काळात तामिळवर्गाला भाजपच्या बाजुने घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल.