मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हँड गँगस्टर युसूफ बचकाना (gangster Yusuf Bachkana) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला हा गॅंगस्टर जेलमधून वसूलीची काम करत असल्याचं समोर आलं आहे. खंडणीसह हत्येच्या प्रकरणात युसूफ बचकानाला ताब्यात घेण्यात आले आहे.  घाटकोपरमधील एका बिल्डरला धमकी देत 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याच्या आरोपात त्याला अटक केली आहे.  


गँगस्टर युसूफ बचकाना हा 2001 पासून जेलमध्येच आहे, तिथून तो खंडणी मागण्यासह हत्येची प्लानिंग करायचा. पोलिसांच्या माहितीनुसार गँगस्टर युसूफ बचकानावर 15 गुन्हे मुंबईत तर 8 गुन्हे कर्नाटकात दाखल आहेत.  पोलिसांच्या माहितीनुसार जेलमध्ये राहून 2 हत्या करण्यासह अनेकांना खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे.  


कसे मागायचा पैसे


क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितलं की, बचकाना जेलमधून फोन करायचा आणि खंडणी मागायचा. तसेच तो खंडणी मागताना संबंधितांना यूट्यूबची लिंक पाठवून आपल्याविषयी माहिती देत लोकांना घाबरवायचा.  चौकशीत माहिती मिळाली आहे की, बीएमसीत काम करणारा एक कर्मचारी  प्रकाश कूंचकरवे त्याच्यासाठी मुंबईत काम करायचा. तो सर्व टार्गेट असलेल्या लोकांचे संपर्क त्याला पोहोचवायचा.


कोण आहे युसूफ बचकाना
युसूफ बचकानाचा जन्म मुंबईत झाला. 16 व्या वर्षी त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा नोंद झाला. त्यानं एका दलालावर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र अल्पवयीन असल्यानं तो लवकर सुटला. त्याचं खरं नाव युसूफ सुलेमान कदरी असे आहे. बिल्डर सुब्बा राव यांच्या हत्येनंतर 2007 पासून युसूफ बचकाना जन्मठेपीची शिक्षा भोगत आहे. गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीबरोबर युसूफने काम केले आहे.


जेलमध्ये राहून केली हत्या
क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी सांगितलं की, बचकानानं 2020 मध्ये आपल्या नेटवर्कचा वापर करुन धारवाड हुबलीत हत्या केली. त्याचं मूळ गाव तिथलं असल्यानं त्याचं ऐकणारी अनेक लोकं तिथं आहेत. तिथल्यासारखं नेटवर्क मुंबईत देखील बनवण्याचा प्रयत्न तो करत आहे.