मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी (Kirit Somaiya Viral Video) आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आणि सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब  दिल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी यासंदर्भात वृत्त दिले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. तसेच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.


काय म्हणाले होते अंबादास दानवे?


विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले की, "काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. ही व्यक्ती खंडणी उकळत असल्याचे आरोप केला. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो."


संबंधित बातमी :