मुंबई:  सीबीआयने गेल (इंडिया) लिमिटेडचे ​​(गेल) कार्यकारी संचालक के. बी. सिंह यांना मंगळवारी 50 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. सिंह यांच्याशिवाय अन्य चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना सीबीआय विशेष कोर्टात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे. 


सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस पाइपलाइन प्रकल्पातील काही कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली, नोएडा आणि विशाखापट्टणममध्ये अनेक ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. सीबीआय टाकलेल्या छाप्यात आरोपींच्या घरातून मोबाईल फोन, गॅजेट्स आणि बँक अकांउटमधील तपशील तपासले.


 










काय आहे आरोप?


गेलच्या दोन पाइपलाइन प्रकल्पांमध्ये (श्रीकाकुलम ते अंगुल आणि विजयपूर ते औरैया) एका कंपनीला फायदा देण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयला 'गेल'च्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


अॅडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक सुरेंद्र कुमार देखील अटकेत


गेलचे कार्यकारी संचालक केबी सिंह यांच्याशिवाय सीबीआयने अटक केलेल्या चार जणांमध्ये वडोदरा येथील अॅडव्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. सुरेंद्र कुमार यांच्यावर दोन गॅस पाइपलाइन प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांना मदत करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. लाच प्रकरणी सीबीआयने दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.


गेल इंडिया कंपनी करते काय?


'गेल इंडिया' ही कंपनी देशामधील सात महारत्न कंपन्यांपैकी एक आहे. 'गेल इंडिया' देशातील नैसर्गिक वायू आणि लिक्वीफाइड पेट्रोलियम गॅसचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. 1984 साली स्थापन झालेल्या गेल इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून तिच्या सेवेचे जाळे भारतभर पसरले आहे.


गेल कंपनी ही वाहनांमध्ये वापरल्या जात असलेल्या नैसर्गिक वायू तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एल.पी.जी.चे वितरण इतर सरकारी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे करते. 


मुंबई महानगर क्षेत्रामध्ये स्वयंपाकासाठी पाईपने गॅस पुरवठा करणारे महानगर गॅस लिमिटेड तसेच पुणे परिसरातील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आदींसह इतर कंपन्यांमध्ये कंपन्यांमध्ये गेल इंडियाची भागीदारी आहे.