Chandrakant Patil : मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु होती. पण या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी युती न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. मनसे सोबत युती होणार नाही, हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.


शिवसेनेला सत्तेतून खेचण्यासाठी भाजपने मनसेसोबत चचपणी करण्यास सुरुवात केली होती. या संभाव्य युतीच्या गेले काही महिने होत असलेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतेय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मनसेशिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे. 


मुंबईत आमचीच सत्ता -
गेल्या निवडणुकीच्या वेळेसच आमचाच महापौर झाला असता, माञ अमीत शाहा यांनी सांगितलं की शिवसेनेला द्या. पण आता तसे होणार नाही, यावेळी मुंबईत भाजपचा महापौर होणार आहे.  117 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 


तुमचं हिंदुत्व काँग्रेसला देखील सांगा -
बाळासाहेबांचं स्मारक शिवसेनेला जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, काहीही बोलू नका, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावाला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, तुमचं हिंदुत्व काँग्रेसला देखील सांगा, उगाच हिंदुत्वाचा आव आणू नका. 


उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवर आम्ही कधी बोललं नाही
उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवर आम्ही कधी बोललं नाही, सदैव त्यांची तब्बेत ठीक राहावी हीच प्रार्थना केली आहे. मात्र त्यांनी जिथे शेतीचे नुकसान झाले आहे तिकडे जावे, काल अपघात झाला तिकडे त्यांनी जावे, यावर आम्ही बोललो होतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करून दाखवा, जो प्रस्ताव खारीज करण्यात आला आहे, असेही पाटील म्हणाले.  


टिपू सुलतान यांच्या नावावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर काय म्हणाले?
मी सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, मैदानाला नाव देण्यावरून सरकार दडपशाही करत आहे हे थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन करु. मी धमकी देत नाही, एखद्या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देणं चुकीच आहे. आम्हाला हे मान्य नाही.  भाजपचा आंदोलनाचा पाठिंबा असेल. भाजप नगरसेवकाने बोर्ड लावले काय किंवा इतर कुणीही लावले असतील तर ते बोर्ड उखडून काढले पाहिजेत.